S M L
  • बाळासाहेबांना अखेरचा 'जय महाराष्ट्र'

    Published On: Nov 18, 2012 03:07 PM IST | Updated On: May 14, 2013 03:11 PM IST

    18 नोव्हेंबरज्या 'शिवतीर्था'वर शिवसेनेचा जन्म झाला त्याच शिवतीर्थावर 46 वर्षांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा 'जय महाराष्ट्र' घेतलाय. संध्याकाळी सहाच्या सुमाराला बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. साहेबांना 21 बंदुकांची सलामी देण्यात आली. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिकांनी 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे, परत या परत बाळासाहेब परत या'चा गजर केला. आणि आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी निरोप दिला. मातोश्रीवरून निघालेली बाळासाहेबांची महाअंत्ययात्रा अलोट गर्दीसह सात तासांनतर शिवाजी पार्कवर दाखल झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी नसेल इतकी गर्दी बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला होती. संपूर्ण शिवाजी पार्कवर नजर फिरवली तर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. महाअंत्ययात्रेत ज्या रथावर बाळासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्या रथाला अनेक शिवसैनिकांनी हात लावून दर्शन घेतलं. आसूसलेल्या डोळ्यात बाळासाहेबांचं रुप साठवून घेत 'साहेब, पुन्हा जन्म घ्या' अशी आर्त हाक दिली. बाळासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयदेव ठाकरेंसह संपुर्ण कुटुंबीय हजर होतं. तसेच बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज,राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे खासदार विजय दर्डा, अभिनेता अमिताभ बच्चन, उद्योजक अनिल अंबानी, नाना पाटेकर आणि शिवसेनेचे सर्व आमदार,खासदार पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close