S M L
  • दुष्काळाच्या झळा :मुलीचं लग्न करायची कशी ?

    Published On: Jan 15, 2013 03:35 PM IST | Updated On: Jan 15, 2013 03:35 PM IST

    माधव सावरगावे,बीड15 जानेवारीदुष्काळावर मात करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातला दुष्काळ अधिक तीव्र होत असल्यानं चारा-पाणी आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चाललाय. दुष्काळाची झळ सहन करणार्‍या शेतकर्‍यांना आपल्या मुलींची लग्नही यंदा थांबवावी लागली आहेत. मराठवाडयातील शेतक र्‍यांची दुष्काळी व्यथा काय आहे, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..दीड एकरावर आपल्या संसाराचा गाडा ओढणारे बाळासाहेब गर्जे... बीड जिल्ह्यातील आष्टीमधल्या बाळासाहेबांना यंदाच्या दुष्काळाची जबर झळ बसलीय. दीड एकर शेती आणि या जमिनीवर असलेली विहीर हेच बाळासाहेब गर्जेंच्या उपजीविकेचं साधन. पण आता ती विहीर कोरडीठाक पडल्यानं शेतीचं उत्पन्न काहीच मिळू शकलं नाही. पोटाची खळगी भरेल, इतकही उत्पन्न मिळालं नाहीये. त्यामुळे त्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी कुठून पैसे आणायचे, असा त्यांना प्रश्न पडलाय.बाळासाहेबांच्या डोक्यावर आधीच एका मुलीच्या लग्नाचं कर्ज आहे. आता दुसर्‍या मुलीचं लग्न थांबवण्याचा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागलाय. ही अवस्था एकट्या बाळासाहेबांची नाही तर मराठवाडयातल्या अनेक शेतकर्‍यांची आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून घोषणा होतायेत. पण त्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी एकही पाऊल पडताना दिसत नाहीये. त्यामुळं पाण्यासाठी पळापळ करणार्‍या गावकर्‍यांना आपला जीव गमवावा लागतोय. आता दुष्काळाची तीव्रता वाढत चाललीये. शेतकर्‍यांचं हे संकट थांबवण्यासाठी सरकारला पाझर कधी फुटणार हाच प्रश्न, हे शेतकरी विचारत आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close