S M L
  • बिल्डराच्या हत्येमागे 'डी गँग'चा हात ?

    Published On: Feb 18, 2013 06:02 PM IST | Updated On: Feb 18, 2013 06:02 PM IST

    सुधाकर काश्यप, नवी मुंबई18 फेब्रुवारीबिल्डर सुनीलकुमार लोहारीया यांच्या हत्येमागे डी गँगचा हात असल्याचं उघडकीला येतंय. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये बिल्डर सुरेश बिजलानी याचंही नाव आहे. बिजलानी आणि अटक आरोपी माजी पोलीस अधिकारी सॅम्युएल अमोलिक हेसुद्धा डी गँगशी संबंधित असल्याचं समजतंय. त्यामुळे या हत्येमागे डी गँग असल्याच्या संशयाला बळकटी मिळत आहे. नवी मुंबईत बिल्डर सुनीलकुमार यांची शनिवारी हत्या झाली.आणि 24 तासांच्या आत नवी मुंबई पोलिसांनी 5 जणांना अटक केली. सुनील कुमार यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या व्यंकटेश शेट्टीयार याला जमावानंच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. यानंतर शेट्टीयार याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी रविवारी आणखी चार आरोपींना अटक केली.यात सुनीलकुमार यांच्यावर चॉपरने वार करणारा वाजीद कुरेशीसह आणखी दोघांना ठाण्यातल्या मुंब्रा भागातून अटक करण्यात आली. तर खळबळजनक अटक होती ती माजी पोलीस अधिकारी सॅम्युअल अमोलिक यांची... एन्काऊंटर स्पेशलिस्ट अमोलिक यांना आज सकाळी नवी मुंबईतूनच अटक करण्यात आली.बिल्डर सुनीलकुमार लोहारीया यांच्या हत्येमागे डी गँगचा हात असल्याचा संशय आता व्यक्त होतोय. आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी हा डी गँगचा माणूस म्हणून नवी मुंबईत ओळखला जातो. माजी पोलीस अधिकारी आणि आरोपी सॅम्युएल अमोलिक यांनी यापूर्वी केलेले एन्काऊंटर हे डी गँगच्या विरोधी गँगचे केले असल्याने त्यांच्यावरसुद्धा डी गँगचा ठपका आहे. नवी मुंबई पोलीस दलात असताना अमोलिक हा बिजलानीचा अंगरक्षक होता.आणि आता निवृत्तीनंतरही तो बिजलानीच्या संपर्कात असल्याचं समोर येतंय. नवी मुंबईतील बिल्डर लॉबीकडून डी गँगला मिळणारा हप्ता, सुरेश बिजलानी याचे डी गँगशी असणारे संबंध आणि त्याचबरोबर सॅम्युएल अमोलिक याचा गुन्ह्यातील सहभाग यामुळे या हत्येमागे डी गँग असल्याचा तर्क सध्या लावला जातोय. पण नवी पोलीस ही हत्या वैयक्तिक मतभेदांतून झाल्याच्या धाग्यावर तपास करत आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close