S M L

9 वाघांची शिकार करणार्‍या टोळीचे 3 जण गजाआड

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2013 04:46 PM IST

9 वाघांची शिकार करणार्‍या टोळीचे 3 जण गजाआड

nagpur arrestनागपूर 15 जून : ग्रामीण पोलिसांनी वाघाची शिकार करणार्‍या एका आंतरराज्यीय टोळीच्या तीन जणांना अटक केली आहे. दोन महिन्याच्या काळात विदर्भ आणि मध्यप्रदेशातील संरक्षित वनांमधील 9 वाघांची शिकार केल्याची या तिघांनी कबुली दिली. दिल्ली पोलिसांच्या माहितीवरुन नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातील बहेलिया समाजातील सिरी, बदलू आणि चिका या तीन शिकार्‍यांना अटक केली आहे. या तिघांनी पाच वाघांची कातडी दिल्लीतील एका तस्कराला विकल्याची कबुली दिली आहे. या टोळीमध्ये 16 जणांचा समावेश असून त्यांचा शोध वनविभागाच्या वतीने घेतला जात आहे. पण वनविभाग मात्र एकाच वाघाची शिकार या टोळीने केली असल्याचा दावा करत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यामध्ये सन 2011 - 12 च्या गणनेमध्ये वाघांची संख्या ही 8 होती पण सध्याच्या गणनेत ही संख्या ही 6 आहे. त्यातही एक वाघ हा मध्य प्रदेशात स्थानांतरीत झाला आहे. नागझिरा अभयारण्यातील राष्ट्रपती, विरु आणि आणखी एक अशा तीन वाघांची मागील सहा महिन्यापासून हालचाली जंगलातील सीसीटीव्ही कॅमेरात सापडल्या नाही. त्यामुळे या वाघांचीही शिकार झाली असल्याचीही भीती वन्यजीव तज्ञांकडून व्यक्त केली.

दोन वाघांची शिकार ही नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे करण्यात आली. तर रामटेक येथ दोन वाघाची, गोंदिया जिल्ह्यातील तुमसर - तिरोडा येथेही दोन वाघांची आणि  उमरेड मध्ये एका वाघाची शिकार करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील मांडाला आणि सिवनी येथील चुई येथे दोन वाघांची शिकार करण्यात आल्याचाही कबुलीजबाब या तिघांनी दिला आहे.

एकीकडे विदर्भात वाघांची संख्या वाढत असल्याचे चित्र असतांना या शिकार्‍यांची टोळीच्या कबुलीजबाबानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्याच्या दावा करुन स्वताच्याच पाठीवर शाब्बासकी देणार्‍या वनविभागाच्या गलथान पणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बहेलिया समाजातील टोळी ही दर उन्हाळ्यात शिकारीचे काम करते हे वन विभागाला माहित आहे. शिवाय या तिघांपैकी एक आरोपी हा अस्वलाच्या शिकारी प्रकरणी वनविभागाच्या कोठडीत होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीवर नागपूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमते वर या घटनेमुळे प्रश्न उपस्थीत झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2013 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close