S M L

मुंबईत मुसळधार, रेल्वे स्लो ट्रॅकवर

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2013 08:36 PM IST

mumbai rain essu23 जुलै :

मुंबई शहराला पावसानं चांगलाच झोडपून काढलंय. सोमवार रात्रीपासूनच शहर, पुर्व पश्चिम उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. संततधार पावसामुळे शहरातील हिंदमाता, परळ, लालबाग, कुर्ला, मीलन सब वे सह शहरातील 19 ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोलमडलीय. बेस्टच्या अनेक बस दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. पावसाचा रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. हार्बर मार्गावर कुर्ला ते वडाळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आलीय. त्यामुळे

प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक देखील 20 ते 25 मिनिटं उशिराने धावताय. वेस्टर्न मार्गावरील रेल्वे वाहतूक देखील संथ गतीने सुरु होती. पुढील 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

पावसाने दोन दिवसांच्या विश्रांती नंतर ठाणे जिल्ह्यात दमदार हजेरी लावलीय. ठाण्यात सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलंय. पुर्व पश्चिम ला जोडणार्‍या पुलाखाली पाणी साचल्यामुळे दुपारपर्यंत या ठिकाणी वाहतूक दुपारपर्यंत थांबवण्यात आली होती. सुदैवाने पावसात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ठाण्यात 33 तलाव आहेत. हे सर्व तलाव तुडुंब भरलेत. यात मासुंदा, उगवण, ब्रम्हाळा, दिवा दापीवली हे मोठे तलाव तुडुंब भरले आहेत.

कोकण रेल्वे ठप्प होण्याच्या मार्गावर

कोकणात मुसळधार पावसामुळे जमीन खचल्यानं कोकण रेल्वेला फटका बसला आहे. रत्नागिरीतल्या निवसरजवळच्या कोंडवी डोंगराला भेगा पडल्यामुळे टाकलेला भराव खचलाय आणि रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालंय. हा रेल्वे ट्रॅक खचल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मंदावली असून कोंडवी जवळ ताशी 10 किमी वेगाने रेल्वे सोडण्यात येत आहे. हा पाऊस असाच आणखी वाढला तर हा डोंगर आणखी खचून कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरू असून भराव सतत खचत असल्यामुळे वर उचललेला ट्रॅकही पुन्हा खचला जातोय.

कोल्हापुरात धरणं फुल्ल

कोल्हापुरातल्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण 100% भरलंय. धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे चार दरवाजे उघडण्यात आलेत. भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होतेय. नदीकाठच्या सगळ्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चंदगड, आजरा, शाहुवाडीत संततधार आहे. राधानगरी धरणाचे ओव्हर फ्लो होणारे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातल्या एका दरवाज्यातून अडीच हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. तर पावसाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम होतोय. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद झालाय. या रस्त्यावर नेळे गावाजवळ रस्त्यावर झाडं पडल्यानं रस्ता बंद झालाय. तर इथला पर्यायी रस्ता बंद असल्यानं वाहतूक खोळंबली आहे.

बंधारा फुटला

तर शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृषी खात्याने बांधलेला बंधारा फुटलाय. त्यामुळे जवळपासच्या 50 एकर शेतीचं नुकसान झालंय. गावडी या गावामध्ये कृषी खात्याने 6 लाख रुपये खर्चून हा बंधारा बांधला होता. पण बंधार्‍याच्या बांधकामासाठी फक्त डोंगरातली मातीच वापरण्यात आली होती. त्यामुळे मुसळधार पावसासमोर या बंधार्‍याचं बाधकाम तग धरु शकलं नाही आणि हा बंधारा फुटलाय. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थेअंतर्गत हा बंधारा बांधला होता. दरम्यान, बंधारा फुटला असला तरीही अजूनपर्यंत याबाबत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

विदर्भात पावसाचा कहर

 

राज्यभरात तुफान पाऊस सुरू आहे. पण विशेषतः पूर्व विदर्भात परिस्थिती चिंताजनक आहे. गडचिरोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. अहेरी तालुक्यातला मोठा तलाव फुटला आहे. यामुळे आजुबाजुच्या परिसरात पाणी घुसलंय. तसंच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोलीतल्या कडेम धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 28 हजार क्युसेक पाणी या धरणातून सोडलंय. आंध्रप्रदेशच्या आदीलाबाद जिल्ह्यातलं हे कडेम धरण आहे. त्यामुळे गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनानं या भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय्. चंद्रपुरात पाऊस वाढलायं. त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी साचायला सुरुवात झालीय. अहेरी आणि सिंरोंचात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. IBN लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं दखल घेत भर पावसात रात्रभर काम करुन या भागातला वीजपुरवठा पूर्ववत केलाय. सुमारे 20 तासांनंतर हा वीज पुरवठा सुरूळीत झालाय.

वर्ध्यात संततधार सुरूच

वर्ध्यातही रात्रभर पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या दोन तासांपासून वर्ध्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. लोअर वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर अप्पर वर्धा धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतचा इशारा देण्यात आलाय. येत्या 48 तासांत वर्ध्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2013 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close