S M L

'शिवतीर्था'वर होणार बाळासाहेबांचा स्मृती चौथरा

Sachin Salve | Updated On: Aug 6, 2013 08:45 PM IST

'शिवतीर्था'वर होणार बाळासाहेबांचा स्मृती चौथरा

balasaheb thakarey shivji park06 ऑगस्ट : ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची सुरूवात झाली त्याच शिवाजी पार्कवर अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारला जाणार आहे. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा चौथरा होण्यामधल्या सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. कोस्टल झोनची शेवटची परवानगी बाकी होती. ती आज मिळाली आहे.

यासाठी महापौर सुनील प्रभू,राहुल शेवाळे,मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी सर्व परवानग्या मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. अखेर सेनेच्या या लढ्याला यश मिळालंय. आता शिवाजी पार्कवर बांधकामविरहीत चौथरा बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ बनण्याचा मार्ग मोकळा झालाय.

17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर अंत्यसंस्कार झाले. याच शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरूवात केली. त्यामुळे शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी मागणी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केली होती.

या मागणीसाठी सेनेनं जोरदार मागणी केली. शिवतीर्थावरच स्मारक झाले पाहिजे अशी मागणी शिवसेनेनं लावून धरली. बाळासाहेबांवर अंत्यसंस्कारनंतर सेनेनं त्याच ठिकाणी चौथरा उभारला होता. मात्र दादरवासीयांनी याला विरोध दर्शवला. खेळाच्या मैदानावर स्मारक होऊ नये अशी भूमिका मैदान बचाव समितीने घेतली. बाळासाहेबांच्या निधनानंतर महिनाभर हा वाद सुरूच होता.

अखेरीस शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेत शिवाजी पार्क सोडलं. पण बाळासाहेबांचं स्मारक झालंच पाहिजे अशी मागणी लावून धरली. मध्यंतरी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्यात आली. पण शिवसेनेची मागणी शिवतीर्थावरच होती. अजूनही बाळासाहेबाच्या स्मारकाचा प्रश्न रखडलेला आहे. पण समस्त शिवसैनिकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची भाषण ज्या मैदानावरून ऐकली त्या शिवतीर्थावर आता स्मृती चौथरा उभारला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2013 08:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close