S M L

राज्यात जादुटोणा विरोधी कायदा लागू

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2013 08:11 PM IST

Image img_167692_jadutoana_240x180.jpg24 ऑगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी गेल्या 14 वर्षांपासून ज्या विधेयकासाठी लढा दिला ते विधेयक आता कायद्याच्या रूपात लागू झाले आहे. राज्यात अंधश्रद्धा विरोधी विधेयकाचा वटहुकूम जारी करण्यात आला.

 

राज्यपाल के.शंकरनारायन यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली असून आजपासून जादुटोणा विरोधी कायदा राज्यात लागू झाला आहे. आता नियमानुसार सहा महिन्यात या वटहुकूमाचं कायद्यात  रूपांतर करावं लागणार आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात जादुटोणा विरोधी विधेयक राज्य सरकारकडून मांडलं जाईल.

 

समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी, यासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर सरकारला जाग आली. दोन दिवसांपुर्वी बुधवारी जादूटोणाविरोधी कायदा वटहुकूम काढून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून यासंबंधीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. आज राज्यपालांनी यावर स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला. आता राज्यात जादुटोणाविरोधी कायदा लागू झालाय. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी यासाठी गेली 14 वर्ष लढा दिला. आज त्यांची ही इच्छा आता पूर्ण झालीय. मात्र गेल्या 14 वर्षात या विधेयकला कडाडून विरोध झाला. त्यामुळे हे विधेयक रखडले गेले.

 

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी 7 जुलै 1995 रोजी अशासकीय विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर दहा वर्षानंतर 15 एप्रिल 2005 रोजी शासकीय विधेयक मांडण्यात आलं मात्र विरोधामुळे स्थगित करण्यात आलं. त्यानंतर 16 डिसेंबर 2005 रोजी विधानसभेत विधेयक मंजूर पण विधान परिषदेत मंजूर झाले नाही. त्यानंतर हे विधेयक चिकित्सा समितीकडे गेले पण निर्णय काही झाला नाही. 2011 मध्ये नव्याने हे विधेयक मांडण्यात आलं पण त्यावर चर्चा झाली विरोध कायम होता. मागिल पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आलं पण यावरही काही निर्णय झाला नाही. या विधेयकाला वारकर्‍यांनी विरोध दर्शवला होता. वारकर्‍यांशी चर्चा करून हे विधेयक नव्या सुधारणा करून मांडलं जाईल अशी माघार घेत सरकारने जाहीर केलं.

जादूटोणाविरोधी विधेयकाला आपला विरोध नाही, असा दावा करत शिवसेना आणि भाजपने केलाय. विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध असल्याचं युतीनं स्पष्ट केलंय. आपलं अपयश झाकण्यासाठी सरकार वटहुकूम काढत असल्याचा आरोपही युतीनं केलाय.

गेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. पण येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक पारित होईल आता हे स्पष्ट झालंय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2013 07:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close