S M L

विराट पर्व ते सेह'वाघ'...'फुल'राणी ते जोको'विन'...धमाकेदार ठरलं स्पोर्ट 2015 !

Sachin Salve | Updated On: Dec 28, 2015 05:04 PM IST

विराट पर्व ते सेह'वाघ'...'फुल'राणी ते जोको'विन'...धमाकेदार ठरलं स्पोर्ट 2015 !

[wzslider]

2015 हे वर्ष भारतीय क्रिडाविश्वासाठी विशेष ठरलं. टीम इंडियाला नवा कॅप्टन मिळाला, काही क्रिकेटर्स लग्नाच्या बेडीत अडकले

तर टेनिस, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि कबड्डीमध्येही भारतानं विशेष कामगिरी केली..नेमकं कसं राहिलं हे वर्ष भारतीय क्रीडा विश्वासाठी याचा हा फ्लॅशबॅक...

विराट पर्वाला सुरुवात

2015मध्ये टीम इंडियाला नवा टेस्ट कॅप्टन मिळाला. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं, टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आणि टेस्ट टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी आली ती, विराट कोहलीवर. कॅप्टन कुल धोणीच्या जागेवर, टीम इंडियाला मिळाला अत्यंत आक्रमक आणि विजयासाठी जीवतोड प्रयत्न करणारा विराट कोहली. महेद्रसिंग धोनीची कमतरता भरुन काढत, नेतृत्व करण्याची जबाबदारी कोहलीवर आली. त्यातही सचिन, राहुल, सौरव, लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत विराटवर नेतृत्वाची जबाबदारी पडली यंग टीम इंडियाला, विराट 2016 मध्ये टीमला नव्या उंचीवर नेईल अशीच त्याच्या फॅन्सची अपेक्षा आहे.

विराटच्या नेतृत्वात 2015मध्ये टीम इंडियानं पहिला ऐतिहासिक विजय नोंदवला. ऑगस्ट-सप्टेबर मध्ये टीम इंडियानं श्रीलंका दौर्‍यात टेस्ट सिरीजमध्ये विजय मिळवला. श्रीलंकेला त्यांच्याच घरात पराभूत करण्याची किमया, विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं केली. श्रीलंकेवर टीम इंडियानं 2-1 असा विजय मिळवला. 1993 नंतर भारतीय संघानं श्रीलंकेत मिळवलेला हा ऐतिहासिक विजय होता. या विजयानंतर टीम इंडियाच्या टेस्ट रँकिंगमध्येही सुधारणा झाली. भारताच्या 3 ओपनरनं एकाच सिरीजमध्ये शतक झळकावण्याचा रेकॉर्डही याच सिरीजमध्ये केला. जागतिक पातळीवरचा हा 5 वा रेकॉर्ड होता हे विशेष...शिखर धवन (134), लोकेश राहुल (108), आणि चेतेश्वर पुजारा (145) यांनी ही 3 शतकं झळकावली होती. याच सिरीजमधल्या दुसर्‍या टेस्टनंतर श्रीलंकेच्या कुमार संगकारनं निवृत्ती घेेतली होती.

त्यानंतर टीम इंडियानं 2015 मध्ये विराट विजय मिळवला, तो दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मिळवलेला टेस्ट विजय. मायभूमित खेळताना विराटच्या टीमनं दक्षिण आफ्रिकेला 3-0 अशी धूळ चारली. गांधी-मंडेला फ्रिडम सीरिजचं अजिंक्यपद टीम इंडियानं पटकावलं. तब्बल 11 वर्षानंतर भारतानं दक्षिण आफ्रिकेवर टेस्टमध्ये 3-0 असा विजय मिळवला होता. या सीरिजमध्ये सर्वाधिक छाप सोडली ती, आर.अश्विननी 31 विकेट घेवून,अश्विननं आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. त्यामुळेचं या सीरिजमध्ये आर.अश्विन 'मॅन ऑफ द सिरीज' ठरला. तर दिल्ली टेस्टच्या दोन्ही डावांमध्ये सेंच्युरी झळकावणारा अंजिक्य रहाणेनही, पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिला. दक्षिण आफ्रिकेला तब्बल 9 वर्षानंतर परदेशात खेळतांना टेस्ट सिरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण भारताच्या या विजयाला गालबोट लागलं ते पीचच्या वादाचं,खराब पिचमुळे ही सिरीज वादग्रस्तही ठरली.

सेह'वाघ' निवृत्त

"मुलतान चा सुलतान" अशी खास ओळख असणार्‍या भारतीयांच्या विरूनं म्हणजेच विरेंद्र सेहवागनं याचवर्षी निवृत्ती घेतली होती. भारताचा आक्रमक ओपनर असणार्‍या सेहवागनं देशासाठी अनेक महत्वाच्या इनिंग्स खेळल्यात. पण त्यापैकी 'द ग्रेट' अशी खेळी होती ती म्हणजे मुलतानमध्ये झळकावलेली 309 रन्सची...भारताचा पहिला ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज ही नवी ओळख वीरुनं मिळवली होती. सेहवागनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर 2001 मध्ये कसोटी पदार्पण करताना एकूण 104 टेस्ट खेळल्यात. ज्यात 23 शतक आणि 32 अर्धशतकांसह एकूण 8586 धावा सेहवागनी केल्यात. यात 319 रन्सची खेळी सर्वोत्कृष्ट होती.

तर वनडे मध्ये एप्रिल 1999 ला मोहालीतून पाकिस्तानविरुद्ध पहिली वनडे खेळणार्‍या सेहवागनं 251 वनडे खेळतांना 8273 रन्स काढलेत. त्यात 15 शतकांसह 38 अर्धशतकांचा समावेश होता. व्हिस्डन लिडिंग क्रिकेटर हा मानाचा पुरस्कार 2009 आणि 2010 असा सलग दोन वेळा पटकाविणार्‍या विरेंद्र सेहवागला 2010 चा आयसीसी प्लेअर ऑफ द इयर च्या प्रतिष्ठीत पुरस्कारनंही गौरविण्यात आलं होतं. डिसेंबर 2011 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध वनडे मॅचमध्ये केवळ 149 चेंडूत केलेली 219 रन्सची 'तडाखेबंद' खेळी ही त्याच्या चाहत्यांना निश्चित सुखावणारीच होती. बांग्लादेश विरुद्ध 175 रन्सची तुफान खेळी करणारा विरेंद्र सेहवाग भारताच्या 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा खराखुरा 'वाघ'च होता असं म्हणायला हरकत नाहीये.

झहीरचा क्रिकेटला अलविदा

भारताचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असणार्‍या झहीर खाननं यावर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एकूण 200 वनडे खेळतांना 282 विकेट्स जहीरच्या नावावर आहेत. तर 92 टेस्टमध्ये 311 विकेट्स घेण्याची कामगिरीही झहीरच्या नावावर आहे. कपिल देवनंतर भारताचा बेस्ट फास्ट बॉलर असं झहीर खान बद्दल नेहमीच बोललं जायचं. दुखापतीमुळे अचानक जहीरच्या करिअरला ब्रेक लागला. 2011 नंतर जहीर, पुन्हा आपली छाप पाडू शकला नाही. दुखापती आणि हरवलेल्या फॉर्ममुळे झहीरनं अखेर 2015 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला.

पुणे आणि राजकोटची आयपीएलमध्ये एंट्री

आयपीएलच्या सुरू झालेल्या विवादावर पर्दा पडला तो 2015 मध्येय चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम

आयपीएलमधून बाहेर गेल्या. या दोन्ही टीम्सवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. तर पुणे आणि राजकोट अशा दोन नवीन टीम 2015 मध्ये आयपीएलएला मिळाल्या. चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी पुण्याकडून खेळणार आहे. तर सुरेश रैना राजकोटकडून खेळणार आहे. 2015मध्ये दोन टीम आयपीएलमधून बाहेर झाल्या. तर दोन नव्या टीम सामील झाल्या.

 लंकेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज

भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिज 2015 मध्ये दोन्ही देशातल्या क्रिकेट फॅन्सना बघायला मिळाली नाही. भारत-पाकिस्तान सीरिज व्हावी म्हणून शहरियार खान , भारतातही आले होते. पण शिवसेनेच्या विरोधानंतर त्यांनी मुंबईमध्ये शशांक मनोहर यांची भेट घेण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर भारतानं यूएईमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळायला नकार दिला. पर्याय म्हणून श्रीलंकेच नाव पुढे आलं. पण 2015मध्ये मात्र भारत-पाकिस्तान सीरिज काही होऊ शकली नाही.

डीडीसीएचा घोटाळा 2015 च्या शेवटी अत्यंत गाजला. महत्त्वाचं म्हणजे थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीचं नाव वादात सापडल्यामुळे, या घोटाळ्याचं देशानं लक्षवेधलं. किर्ती आझाद, बिशनसिंग बेदी अशा क्रिकेटपटूंनी गेल्या आठ वर्षांपासून हा भ्रष्टाचाराचा विषय लावून धरला होता. पण आप सरकारमुळे पुन्हा एकदा डीडीसीएचा घोटाळा चर्चेत आला. आयपीएलच्या वादातून बाहेर पडण्याआधी, क्रिकेटमधल्या आणखी एका घोटाळ्यानं तोंड वर काढलंय.

रैना, कार्तिक, रोहित, भज्जी विवाहबद्ध

यावर्षाच्या सुरवातीला पहिल्यांदा सुरेश रैनानं 3 एप्रिलला प्रियंका चौधरी सोबत लग्न केलं, त्यानंतर दिनेश कार्तिकनं भारताची स्क्वॅश खेळाडू दीपीका पल्लीकल हिच्याशी 18 ऑगस्टला लग्न केल होतं. तर भारताचा ग्रेट स्पिन गोलंदाज हरभजन सिंगनं त्याची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत 28 ऑक्टोबरला लग्न केलं होतं. आता या रेसमध्ये भारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंग हाही सामील झालाय. त्यानं नुकतच इंडोनेशियाच्या बाली शहरात ब्रिटीश अभिनेत्री हेजल कीचशी एंगेजमेंट केली होती. त्यामुळं युवराज आणि हेजल 2016 च्या फेब्रुवारीत बोहल्यावर चढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतीये.

'मनीमॅन'ची इनिंग संपली

भारतीय क्रिकेटचा 'मनीमॅन'असं जगमोहन दालमिया यांच्याविषयी बर्‍याचदा म्हटलं जातं. यावर्षी 20 सप्टेंबरला जगमोहन दालमियांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळं भारतीय क्रिकेटचं मोठ नुकसान झाल्याची खंत दालमियांचे एकेकाळचे विरोधी स्पर्धक असणारे शरद पवार यांनी व्यक्त केली होती. खरचं दालमियांनी त्यांच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर भारतीय क्रिकेटला वेगळ्याच उंचीवर पोहचवलं होतं. पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेपासून आपली क्रिकेट व्यवस्थापनातली न्यु इनिंग सुरू करणारे जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अध्यक्षही राहिलेले आहेत. शिवाय आयसीसीच्या अध्यक्षपदी असतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दालमियांनी अवघ्या जगाला दाखवून दिली होती.जगमोहन दालमियांची एकूण कारकीर्द मात्र बर्‍याच प्रमाणात वादग्रस्त ठरली होती.

सानियाची 10 डबल्स विजेतीपदाला गवसणी

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं हे वर्ष गाजवलं ते तिच्या विजेतेपदांमुळे...भारतातर्फे महिलांच्या डबल्स ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी सानियानं याच वर्षी केलीये. हे यश जरी मिक्स डबल्समधलं असलं तरी त्याचं महत्व

सिंगलपेक्षा नक्कीच कमी नाहीये. अत्यंत मानाच्या अशा विम्बल्डन डबल्स, यु.एस.ओपन आणि डब्ल्युटीए डबल्स अशी 3 प्रमुख विजेतेपदं सानिया-हिंगीसच्या जोडीनं एकाच वर्षात जिंकलीये. त्यांच्या या विजेतेपदांमुळे आता त्यांच्या फॅन्सनं त्यांना सॅनटिना असं नवीन नाव दिलयं. यावर्षात सानियानं एकूण 10 डबल्स विजेतीपदं मिळवलीये. त्यापैकी डबल्समधली सहकारी मार्टीना हिंगीसोबत सानियानं तब्बल 9 विजेतेपदं मिळवलीये. या विजेतेपदांसोबतच वर्ल्ड रँकिंगमध्ये नंबर वन क्रमांक मिळवलाय. कारण तब्बल 15 वर्षानंतर एका भारतीय खेळाडुनं जागतिक पटलावर पहिला क्रमांक मिळवून आपलं वर्चस्व निर्माण केलंय. यापूर्वी लिएंडर पेस आणि महेश भुपतीनं 90 च्या दशकात तगडे प्रतिस्पर्धी असतांनाही आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं.

यू-मुम्बा प्रो कबड्डी लीगची चॅम्पियन

प्रो कबड्डी लीगचा दुसरा सिझनही प्रचंड यशस्वी ठरला. पहिल्या सिझन इतकाच दुसरा सिझनही गाजला. महाराष्ट्राच्या मातीतल्या या खेळाचं, विजेतेपदही यावर्षी यू-मुम्बानं पटकावलं, पहिल्या सिझनमध्ये हुकलेली विजयाची संधी यावेळी यू-मुम्बानं पटकावलं. मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात यू-मुंबानं, बंगळुरू बुल्सचा पराभव करत अजिंक्यपद पटकावलं. या विजेतेपदात सिंहाचा वाटा होता तो चढाईपटु

शब्बीर बापुचा,मुंबईकर विशाल माने आणि चढाईपटु रिशांक देवाडिगा यांनीही भन्नाट खेळ करत यू मुंबाला विजेतेपद मिळवून दिलं. एकंदरीतचं कबड्डीची लोकप्रियता हळूहळू क्रिकेटला टक्कर देणार का ते बघावं लागेलं. 2015च्या यशानंतर प्रो-कबड्डीसाठी 2016 सालं कसं असेलं ते बघावं लागेलं.

'फुल'राणी नंबर 1

भारताची 'फुल'राणी सायना नेहवालनं 2015मध्ये आपलं वर्ल्ड बॅडमिंटनमध्ये आपलं पहिलं स्थान, यावर्षीही कायम राखलं. ऑल इंग्लंड आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकांची कमाई केली. महत्वाचं म्हणजे चिनच्या बॅडमिंटनपटूंना आपण जोरदार टक्कर देऊ शकतो. हा विश्वासही सायनानं निर्माण केला. 2015 मध्ये सायनाला दुखापतीनं चांगलचं ग्रासलं. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे सायनाच्या खेळावरही परिणाम झाला.तसंच यावर्षी सायनानं नव्या कोचसोबत सुरुवात केली. कोच विमलकुमार यांनी सायनाला दुखापतीतून सावरायला मदत केली. यावर्षी जकार्तामध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत खेळणारी 'पहिली भारतीय बॅडमिंटनपटु' असा नवा रेकॉर्ड सायनानं केला. यास्पर्धेच्या अंतिम सामन्यात वर्ल्ड नंबर वन असणार्‍या स्पेनच्या कॅरोलिना मारीनला सानियानं कडवी झुंज देत सिल्व्हर मेडलला पटकावलं. भारतीय बॅडमिंटनमधला हा एक ऐतिहासिक क्षण होता.

भारताची तरूण महिला बॅडमिंटनपटु पी.व्ही.सिंधुनं 2015 हे वर्ष गाजवलं ते म्हणजे तिच्या मकाऊतल्या विजेतेपदानं....सिंधुनं जपानच्या मिनात्सू मितानिया हिला हरवत 'मकाऊ ओपन ग्रँण्ड प्रिक्स गोल्ड' स्पर्धा जिंकण्याची हॅटट्रीक पूर्ण केली. आपली सर्व क्षमता पणाला लावत या हैद्राबादीयन गर्लनं मकाऊ वुमेन्स सिंगलचं हे विजेतेपद मिळवलं. ह्या जेतेपदामुळं सिंधुनं जागतिक पातळीवर 13 वं स्थान पटकावलंय.आता 20 वर्षीय पी.व्ही.सिंधु इंडोनेशियात होणार्‍या वुमेन्स सिंगल मास्टर्स ग्रँण्ड प्रिक्स गोल्ड स्पर्धेसाठी तयारीला लागलीये. त्यामुळे पुढच्या वर्षीही सिंधु अशीच धमाकोदार कामगिरी करणार का? याकडं तिच्या फॅन्सच लक्ष राहणार आहे.

ISL 2 ची चेन्नईयन चॅम्पियन

आयसीएलच्या दुसर्‍या सिझनचं अजिंक्यपद पटकावलं ते चेन्नई एफसीनं. गोवा आणि चेन्नईच्या टीम्स फायनलमध्ये आमने-सामने आल्या. आणि दोन्ही टीम्सनी अत्यंत जबरदस्त खेळ केला. पण अखेर चेन्नईनं 3-2 असा विजय मिळवतं. दुसर्‍या सिझनचं अजिंक्यपद पटकावलं. गोव्याच्या टीमनं दुसर्‍या सिझनमध्ये सुरवातीपासून दर्जेदार खेळ केला. पण फायनलमध्ये गोव्याच्या टीमला पराभव स्वीकारावा लागला.आयसीएलच्या पहिल्या सिझनपेक्षा, दुसर्‍या सिझनमध्ये प्रेक्षकांचा पाठिंबा वाढलेला दिसला.

नोव्हाक जाको'विन'च !

यावर्षी झालेल्या एटीएफ वर्ल्ड चँपियन-2015 या स्पर्धेत पुरूष एकेरीत 28 वर्षीय सर्बियन खेळाडू नोव्हाक जाकोविच यानं विजेतेपद मिळवलंय. एटीएफच्या यादीत जाकोविचनं जागतिक स्तरावर आपला पहिला क्रमांक कायम राखलाय. त्यानं यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, विंम्बल्डन आणि यु.एस.ओपनची विजेतीपदंही जिंकलीये. त्यातही एक मोठा झटका त्याला मिळाला तो फ्रेंच ओपन स्पर्धेत नवख्या वांव्रिकाविरूद्ध झालेला पराभव...पण तरीही रॅफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दोघांच्या तुलनेत नोव्हाक जाकोविचनं हे वर्ष खर्‍या अर्थानं गाजवलं असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या सोबतच महिला एकेरीत अमेरीकन टेनिसपटु सेरेना विल्म्यस हिनं पुन्हा एकदा आपला दबादबा सिद्ध करतांना एटीएफ वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियन-2015 चं विजेतेपद मिळवलंय. सेरेना विल्म्यसनं यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, आणि विंम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद स्वतःकडे कायम राखत महिला टेनिसमधलं तिचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तिच्या भूमीत झालेल्या यु.एस.ओपन स्पर्धेत मात्र सेरेनाला सेमी फायनलपर्यंतच मजल मारता आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2015 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close