S M L
  • खोटा पैसा खरी कहाणी

    Published On: Nov 12, 2008 01:50 PM IST | Updated On: May 13, 2013 04:18 PM IST

    व्ही.के.शशीकुमार ' खोटा पैसा खरी कहाणी ' हा रिपोर्ताज आहे नेपाळमध्ये बनावट भारतीय चलनाचं नेटवर्क उघड करणारा. बनावट भारतीय नोटांचं स्मगलिंग भारत-नेपाळ सीमेवर वाढतंय. नेपाळच्या तेरई भागातला बिरगंज प्रांत आता भारतात येणार्‍या सर्व बनावट नोटांच्या व्यवहाराचं मुख्य ठाणं बनलंय.नेपाळमध्ये अन्सारीचं बनावट नोटांचं नेटवर्क सर्वात मोठं आहे. त्याच्याकडे या नोटा काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येतात. या नोटा सोमेश्वर या बिरगंजमधील अन्सारीच्या हस्तकाकडे पोहचतात. तिथून त्या छोट्या पुडक्यात बांधून भारतातल्या वेगवेगळ्या भागात पोहोचवल्या जातात. आयएसआय या नेटवर्कचा वापर करून बनावट नोटा बांग्लादेशातून काठमांडुत आणतं. युसुफ अन्सारी हा आयएसआयचा आणि डी कंपनीचा नेपाळमधील प्रमुख आहे. काही छोट्या-मोठ्या व्यापाराबरोबरच तो दोन एफएम रेडिओ स्टेशनही चालवतोय. एक न्यूज चॅनल चालवण्यातही त्याचा पुढाकार आहे. त्याचे वडील सलीम मियॉ हे राजा ग्यानेंद्र सत्तेवर असताना कॅबिनेट मंत्री होते. युसुफ अन्सारी याच राजा ग्यानेंद्रचा मुलगा पारसचा जवळचा मित्र आहे. पारस सध्या सिंगापूरमध्ये राहतोय. पारसनंच अन्सारीला बनावट नोटांच्या व्यापारासाठी मदत केली, हे उघड गुपित काठमांडूत सर्वांना माहीत आहे. भारत आणि नेपाळच्या गुप्तचर संघटनांनीही ते मान्य केलंय.भारत-नेपाळ सीमेजवळचा परिसर पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या लोकांनी काबीज केलाय. कारण त्यांना नेपाळमधून भारतात कोटी रुपयांचं बनावट भारतीय चलन पाठवायचंय. हेतू एकच दहशतवादाला आर्थिक मदत पुरवणं आणि भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणं. बनावट भारतीय नोटांच्या सुळसुळाटामुळं नेपाळमधील व्यापारी संघटनाही सध्या मोठ्या चिंतेत आहेत. नेपाळमधले खाजगी उद्योगही याच चिंतेनं त्रासून गेलेत. बिरगंज हे बनावट नोटांच्या व्यापाराचं मोठं केंद्र आहे. बनावट नोटांचा काळाबाजार खूप दूरवर पसरलाय. त्यामुळे आपणही नकळत त्यात गोवले गेलोय, हे आता भारतीय व्यापारीही नाकारत नाहीत.नेपाळची राजधानी काठमांडू हे पाकिस्तानची आयएसआय आणि दाऊद इब्राहिमची ' डी ' कंपनी यांचं भारतविरोधी कारवाया करण्याचं मुख्य केंद्र आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्यांचा मुख्य भाग. इथूनच नेपाळमध्ये बनावट चलन पाठवलं जातं. पण त्याचा उगम होतो पाकिस्तानात. कारण तिथल्या मुलतान आणि कोट्टातल्या आयएसआयच्या प्रिंटींग प्रेसमध्ये या नोटांची छपाई होते. या नोटांसाठीचा कागद मात्र लंडनमधून आयात केला जातो. सध्या बांग्लादेश आणि थायलंडमधल्या प्रिंटींग प्रेसचा वापरही केला जातोय. आयएसआय या बनावट नोटांची वाहतूक दोन मार्गांनी करतं. पाकिस्तान इंटरनॅशनल विमानसेवा आणि दुबई, कौलालंपूर, हॉगकॉंग, बैंकॉक , कोलंबो आणि ढाकामार्फत. या ठिकाणांहून आयएसआयचे हस्तक बनावट नोटा पाकिस्तानी विमानसेवेमार्फत काठमांडुत आणतात. तिथून या नोटा बिरगंजला नेल्या जातात. आणि मग त्या खुल्या सीमेवरुन आयएसआयच्याच सक्षम नेटवर्कद्वारे भारतात पाठवल्या जातात. रक्सौल रेल्वे स्टेशन हा बिरगंजहून निघणार्‍या बनावट नोटांचा मुख्य मार्ग आहे. इथूनच या नोटा पटना, कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि बंगलोरला पाठवल्या जातात. नेपाळच्या कायदे अधिकार्‍यांनी मात्र भारतात येणार्‍या बनावट नोटांचे आणखी दोन मार्ग शोधून काढलेत. त्यातला पहिला आहे, नेपाळ सीमेवरचं बेहरवा गाव. इथून बनावट नोटा सीमेपलीकडे पोहचवल्या जातात आणि तिथून त्या रेल्वेनं गोरखपुर, लखनऊ, दिल्ली आणि मुंबईत पोहोचतात. तर दुसरा मार्ग आहे, नेपाळ सीमेवरील बिरगंज ते बिरतानगर. या मार्गाने बनावट नोटा दरभंगा , इनरवा, सिलिगुडी आणि कोलकात्यात पाठवल्या जातात. काठमांडुतले आयएसआयचे हस्तक हजार रुपयाच्या एका बनावट नोटेमागे तब्बल 500 रुपये इथल्या डिलरला देतात. हे डिलर एक लाख रुपयाच्या बनावट नोटांसाठी 500 रुपये कुरिअरवाल्याला देतात. अशा पद्धतीनं या नोटा रक्सौल आणि सीमेजवळच्या बिहारमधल्या छोट्या गावात पोहोचतात. भारतातल्या ग्राहकांना मात्र याच हजार रुपयाच्या बनावट नोटेसाठी सातशे रुपये मोजावे लागतात. नेपाळ हे बनावट भारतीय नोटांचं केंद्र बनलंय पण सरकार आणि राजकीय नेत्यांना त्याविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता दाखवताना दिसत नाही. पण पाकिस्तान अशा बनावट नोटा नेपाळमार्गे भारतात राजरोसपणे पाठवत राहिलं, तर या आर्थिक दहशतवादाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close