S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का ?
  • दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का ?

    Published On: Dec 16, 2008 06:03 PM IST | Updated On: May 13, 2013 01:51 PM IST

    मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे. हल्ला करणार्‍यांपैकी मोहम्मद अजमल कसाब या दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात यश आलं आहे. 26/ 11 च्या हल्ल्याचा तपासाचा केंद्रबिंदू हा कसाब झाला आहे. मुंबई पोलीस पुरावे गोळा करत आहेत. येत्या काही महिन्यात न्यायालयात खटला ही सुरू होईल. पण कसाबचं वकीलपत्र कोण घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अ‍ॅड. अशोक सरोगी आणि अमरावतीचे वकील महेश देशमुख यांनी कसाबचं वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवल्यावर शिवसेनेच्यावतीनं निदर्शेनं करण्यात आली.यावरच होता आजचा सवाल. प्रश्न होता दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं, हा देशद्रोह आहे का ?. यावरील चर्चेत अ‍ॅड. महेश देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अ‍ॅड. हरीश मोटा सहभागी झाले होते. कसाबचं वकीलपत्र घेण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या महेश देशमुख यांच्यापासून चर्चेची सुरुवात झाली. तुम्हाला कसाबचं वकीलपत्र घ्यावासं वाटतंय ? या आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले, घटनेनं दिलेला हा अधिकार आहे. वकीलपत्र दाखल करण्यासाठी त्याला मला भेटायचंय. तो निदोर्ष आहे की नाही, हे कोर्ट ठरवणार '. दरम्यान, कसाबचं वकीलपत्र नाकारण्याचा निर्णय घेतलेले अ‍ॅड. दिनेश मोटा म्हणाले की शेकडो लोकांचे खून निदर्यीपणे करणार्‍या कसाबचं वकीलपत्र घेणं मला मान्य नाही. या निर्णयामुळे माझी सनद जाऊ शकते, हे मला माहीत आहे. वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवणार्‍या वकिलांच्या घराबाहेर शिवसेनेतर्फे आंदोलनं होत आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, लोकशाही आणि न्यायप्रक्रिया ही नंतरची गोष्ट आहे. कसाबचं वकीलपत्र घेणार्‍यांचे मेंदू तपासले पाहिजे.' या सर्व चर्चेत अ‍ॅड. राजू पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. ' कसाबबाबत निर्णय घेण्यास न्याय यंत्रणा सक्षम आहे. कसाब किंवा त्याचे नातेवाईक, पाक कॉन्स्यलेटनं या दोन्ही वकिलांशी संपर्क साधला होता का ? कसाबचं वकीलपत्र घेण्याची इच्छा आणि स्वत: कसाबचं वकीलपत्र देण्याची इच्छा यात खूप फरक आहे. जोपर्यंत कसाब वकील नेमण्याची इच्छा व्यक्त करत नाही, त्याआधीच मी वकीलपत्र घेईन, हे म्हणणं योग्य होणार नाही. मात्र निपक्ष खटला चालण्यासाठी वकील आवश्यक आहे ', असं पाटील म्हणाले. चर्चेदरम्यान संजय राऊतांनी अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा काढला. 'अफझल गुरुला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या पण त्याला फासावर लटकवण्यात आलं नाही. आता कसाबला जाहीरपणे फासावर लटकवलं पाहिजे. त्यातून पाकला दाखवू की आम्हीही सूड घेऊ शकतो ', असं संजय राऊत यांनी सांगितलं. दहशतवाद्यांचं वकीलपत्र घेणं हा देशद्रोह आहे का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 94 टक्के लोकांनी ' हो ' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले, हे गुंतागुंतींचं प्रकरण आहे. पण न्याययंत्रणेनं कसाबला लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे तरच जनतेचा असंतोष कमी होईल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close