S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • चेन्नईत शतक झळकावून सचिननं टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत का?
  • चेन्नईत शतक झळकावून सचिननं टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत का?

    Published On: Dec 17, 2008 09:41 AM IST | Updated On: May 13, 2013 01:50 PM IST

    सचिन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या टेस्ट क्रिकेटमधल्या 41 व्या शतकामुळे. सचिनच्या शतकामुळे भारताला विजय मिळाला आहे, असं सगळेच म्हणतायत. 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सचिननं त्याचं चेन्नई कसोटी क्रिकेटमधलं शतक अर्पण केलं. या घटनेनं सचिनला असलेल्या सामाजिक बांधिलकीचं सगळ्यांनीच कौतुक केलं. पण दुसरी सचिनवर टीका होत असते त्याचं काय ? सचिन स्वत:साठी खेळतो, देशासाठी खेळत नाही, जेव्हा सचिन देशासाठी खेळतो तेव्हा भारताला विजय मिळत नाही... अशी त्याच्यावर होणारी टीका खोटी आहे का ? टीकाकार सचिनला का लक्ष्य करताहेत ? आणि सचिनच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघातल्या ज्येष्ठ खेळाडूंचं भवितव्य सारखे असंख्य मुद्दे सचिनमुळे भारताला लाभलेल्या चेन्नई टेस्टमधल्या विजयानं पुन्हा एकदा समोर आले आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर आधारलेला ' आजचा सवाल 'चा प्रश्न होता. ' चेन्नईत शतक झळकावून सचिननं टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत का ? या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर, क्रिकेट स्टॅटिस्टिशियन सुधीर वैद्य, क्रिकेट समीक्षक संजय क-हाडे, माजी क्रिकेटपटू, क्रिकेट प्रशिक्षक लालचंद रजपूत यांचा सहभाग होता. सचिन संपलाय असं म्हणणा-यांना सचिननं चोख उत्तर दिल्याचं दिलीप वेंगसरकर यांचं चर्चेत मत होतं. दिलीप वेंगसकर म्हणाले, " सचिन संपलाय का, असं विचारणंच हास्यास्पद आहे. असे अर्थहीन प्रश्न विचारणा-याला क्रिकेट समजत नाही असंच मी म्हणेन. गेल्या 18 - 20 वर्षांपासून सचिन खेळत आहे. त्या काळात त्याने स्वत:ला, स्वत:च्या क्षमतेला भरपूरच सिद्ध केलं आहे. ते पाहता त्याने अजून स्वत:ला टीकाकारांमुळे सिद्ध करायला हवं, असं मला वाटत नाही. तो खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. त्याची तुलना कोणशीही होऊ शकत नाही. चर्चेत सहभागी झालेले लालचंद रजपूतही दिलीप वेंगसरकरांच्या मताशी सहमत होते. " सचिनवर टीका करणा-यांना क्रिकेट समजत नाही असं वाटायला लागलं आहे. त्याच्याबद्दल अशाप्रकारची चर्चा करणंच चुकीचं आहे. ज्यावेळेला तो मैदानावर खेळायला उतरतो त्यावेळेला भारतासाठी खेळण्याच्या इर्ष्येनंच उतरतो. मी त्याला इतके वर्षं जवळून पाहतोय... तो कधी वैयक्तिक खेळीसाठी खेळाल्याचं मला कधी आठवतच नाही. " " सचिनवर होणा-या टीका या बीनबुडाच्या असतात. सचिनने स्वत:चा परफॉर्मन्स दुस-यांसाठी तरी सिद्ध का करावा, याची गरजच नाही. कारण तो महान फलंदाज आहे आणि असणार आहे. सचिनवर होणारी टीका ही हेकेकोरपणानं होत आहे. कधी कधी त्याच्याकडून फार जास्त अपेक्षा केल्यानं टीकाकारांचा अपेक्षा भंग होत आहे. या टीकेला काही अर्थच नाहीये, " असं मत संजय क-हाडे यांनी चर्चेत व्यक्त केलं. क्रिकेट स्टॅटिस्टीशियन सुधीर वैद्य यांनी आपलं मत सांख्यिकीच्या आधारानं मांडलं. त्यांनाही सचिनवर होणारी टीका अजिबात मान्य नाहीये. सुधीर वैद्य संगतात, " सचिनला बरोबर घेऊन भारत 41 क्रिकेटटेस्ट क्रिकेटचे सामने खेळला आहे. पौकी 15 कसोटी सामने भारत जिंकला आहे. 9 हरला आहे. तर त्यातले 17 सामने ड्रॉ झाले आहेत. या आकडेवारीवरून तरी टीका करणा-यांनी आपली मतं बनवावीत. "चेन्नईत शतक झळकावून सचिननं टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत का? या प्रश्नावर 86 टक्के लोकांनी ' होय ' आणि 14 टक्के लोकांनी ' नाही ' असा कौल दिला. चर्चेच्या शेवटी निखिल वागळे म्हणाले, " 2011 चा विश्वकप भारताने जिंकायला हवा. त्यावेळी नशीब सचिनला नक्कीच साथ देणार. कारण नियती बहादूरांना नेहमीच साथ देते. सचिन हा एक प्रगल्भ आणि समर्थ खेळाडू आहे. सामाजिक जाणीवेच्या बाबतीतही तो समर्थ आहे. त्यामुळे सचिनवर टीका करणं हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. हे कधीतरी टीकाकारांच्या लक्षात यायला हवं." ' 2011 चा विश्वकप खेळून सचिनने टीकारांच्या तोंडावर कायमची चिकटपट्टी लावावी, ' अशी इच्छाही निखिल वागळेंनी चर्चेच्या शेवटी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close