S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरताहेत का ?
  • नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरताहेत का ?

    Published On: Dec 26, 2008 03:33 PM IST | Updated On: May 13, 2013 01:25 PM IST

    उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसादिवशी 50 लाख रुपये देण्यास इंजीनिअर एम. के. गुप्ता यांनी नाकार दिला. त्यामुळे बसपचे आमदार शेखर तिवारी, बसपचे कार्यकर्ते मनोज त्यागी आणि अन्य काहींनी इंजीनिअर एम. के. गुप्ता यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एम. के. गुप्ता यांचं निधन झाल्याची घटना प्रकाशात आली आहे. या घटनेमुळे उत्तरप्रदेशात आंदोलन सुरू झालं आहे. तिथे काही ठिकाणी हिंसाचारही सुरू झाले आहेत. तर यावरच 'आजचा सवाल ' होता - नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरताहेत का ? या प्रश्नाचा रोख केवळ मायावतींवर केवळ बहुजनसमाजावर किंवा केवळ उत्तरप्रदेशातल्या घटनांवर नाही आहे. तर आजकाल सर्वच राज्यातले नेते त्यांचेत्यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करतात. वाढदिवसासाठी मोठमोठी होर्डिंग्स लावतात. मोठमोठे कार्यक्रम घेतात. या वाढदिवसांसाठी वर्गणी गोळ्या केल्या जातात. वर्गणी देण्यास नकार दिलेल्यांना मारहाण केली जाते. तरीसुद्धा या नेत्यांना त्याची खंत वाटत नाही. नेते वाढदिवस साजरा करणं हा आपला हक्क मनतात. मीडियामधूनही या नेत्यांच्या वाढदिवसाची जाहिरातबाजी केली जाते. राजकारणात असताना नेत्यांना अशाप्रकारे वाढदिवस साजरे करणं आवश्यक आहे का, आपली संस्कृती अशा बडेजावकीमध्ये अडकते आहे का, चर्चेचा मूळ मुद्दा होता. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन आहिर, युवक क्रांती दलाचे नेते कुमार सप्तर्षी, शिवसेनेचे आमदार गुलाबराव गावंडे, आयबीएन-लोकमतचे न्यूज एडिटर सुभाष शिर्के या नामवंत पाहुण्याचा समावेश होता.घटनेचं विश्लेषण करताना कुमार सप्तर्षी म्हणाले, " भयंकर घटना आहे. एका रात्रीच घडलेली नाही. नेत्यांच्या वाढदिवसांसाठी पैसा जमवणं हे रोगाचं लक्षण आहे. रोग वाढतो आहे. कोणत्या नेत्याचा किती मोठा वाढदिवस साजरा झाला यातून त्या पक्षाचं पक्षातलं स्थान स्पष्ट होतं. माणसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याची आपली परंपरा आहे. वाढदिवासासाठी लोकांकडून जबदस्तीनं पैसा जमवल्यामुळे त्या नेत्यांचं लोकांच्यामधलं महत्त्व कमी होतं आहे. " " आपल्या नेत्यांना आपुलकीनं सदिच्छेनं भेट द्यावी हा त्यामागचा हेतू असतो. सामाजिक बांधिलकी ठेवून ते साजरा केला जातो. उत्तरप्रदेशातल्या घटनेनं आपल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करायला हवेत का, यावरही प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. पण म्हणून नेत्यांचे वाढदिवस साजरे करायचेच नाहीत हे मला काही योग्य वाटत नाहीये. कार्यकर्ते नेत्यांना खुश करण्यासाठी वाढदिवस करताहेत का, ते तापासलं पाहिजे. वाढदिवसाला सामाजिक अंग असायला हवं, " असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन आहिर यांनी व्यक्त केलं. शिवसेनेमध्येही नेत्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. विशेषत: शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागते. शिवसेनेचे आमदार गुलाबराव गावंडे यांच्यावरही वाढदिवसानिमित्त खंडणी गोळा करण्याचे आरोप झाले आहेत. चर्चेत नेत्यांच्या वाढिदिवसाबाबत गुलाबराव गावंडे म्हणाले, " शिवसेनाप्रमुखांचा आणि मायावतींचा वाढदिवस साजरा करण्यात जमीनआसमानचा फरक आहे. कौटुंबिक आणि सार्वजनिक असे दोन प्रकारचे वाढदिवस असतात. सेनाप्रमुखांचा वाढदिवस हा कौटुंबिक असतो." या तिन्ही पाहुण्यांनी मांडेलेल्या मुद्द्यांचं विश्लेषण करताना आयबीएन-लोकमतचे न्यूज एडिटर सुभाष शिर्के यांनी सांगितलं, " नेत्यांचे वाढदिवस ही राजकीय खेळी असते. आपलं स्थान नेत्यांच्या मनात आणि पक्षात वाढावं यासाठी सगळं चाललेलं असतं. " नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरताहेत का ? यावर 98 टक्के लोकांनी ' होय ' असा कौल दिला. या चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे एडिटर निखिल वागळे म्हणाले, " नेत्यांचे वाढदिवस जनतेला नको आहेत. नेत्यांचे वाढदिवस जनतेला गळफास ठरत आहेत. वाढदिवसाचं राजकारण महाराष्ट्रात होऊ द्यायचं नसेल तर सर्व राजकीय नेत्यांनी काही निर्धार करायला हवेत. वाढदिवस खाजगी पद्धतीनं साजरा करणं ठीक आहे. पण या वाढदिवसातून सत्तेचं आणि संपत्तीचं ओंगळवाणं दर्शन होऊ देऊ नये. "

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close