S M L
  • एक अनमोल ठेवा !

    Published On: Mar 8, 2012 02:25 PM IST | Updated On: May 13, 2013 03:53 PM IST

    संगीताच्या प्रेमापोटी संगीतवरच्या संशोधनाचा ध्यास सुरु झाला. पसारा वाढत गेला. छोट्या खोलीतल्या पुस्तकातून दोन मजले भरुन ही कथा आहे- रामनाथ पंडित रिसर्च सेंटरची... या संस्थेचे सर्वेसर्वा एस.के.पंडित यांनी 1978मध्ये संस्था स्थापन केली. कोणालाही कल्पना येणार नाही की तळेगावमधल्या या वास्तूत कला, भाषा आणि संस्कृतीविषयीचा खजिना असेल. टीआयएफआरमधून 1993 मधून रिटायर्ड झालेले श्रीराम कृष्ण पंडित म्हणजेच एस.के.पंडित यांनी हा खजिना गोळा केला, त्यासाठीची त्यांची साधना आहे ती चाळीस वर्षांची. त्यांचं बालपण कोचीनमध्ये आणि शिक्षण बँगलोरमध्ये झालं. नंतर ते टीआयएफआरमध्ये सायंटिस्ट म्हणून रुजू झाले. घरात पुस्तक आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या पंडित यांचं मराठी संगीतावर नितांत प्रेम. याच संगितावरच्या प्रेमातून त्यांची पावलं संशोधनाकडे वळली. पुढे मराठी रंगभूमीविषयावरची पुस्तकं-हस्तलिखितं, रेकॉर्ड्स, मराठी नियतकालिकं, वृत्तपत्र असा जवळपास दिड लाखांचा संग्रह जमा झाला. मराठी, गुजराथी, कन्नड, तेलगु, मल्याळी,बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांनी इथे बस्तान मांडलंय. पण या संग्रहाला एस.के.पंडित लायब्ररी म्हणत नाहीत. इतका लाखामोलाचा दस्तावेज जमा होईल याची कल्पनाही सुरुवातीला पंडित यांना नव्हती. यातला कित्येक ऐवज त्यांच्याकडे न मागता आला आहे. मराठी पत्रकारितेचे आद्यप्रवर्तक 'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा उल्लेख अनेकवेळा होतो. पण त्यावेळचे अंक अतिशय दुर्मिळ आहेत.. 1820 सालापासूनचे त्यांचे पत्रव्यवहार, त्यांनी काढलेली नियतकालिक संस्थेकडे आहेत. तशीच गोष्ट बेळगावसमाचार या वृत्तपत्राची. इतर कुठेच उपलब्ध नसणारे अंक इथे आहेत. पहिला दिवाळी अंक म्हणून मनोरंजन या अंकाचं नाव घेतलं जायचं.. पण पंडितांनी हे काही वर्षांपूर्वी खोडून काढलं. सर्वात जुनं मासिक दिग्दर्शन... इतरत्र कुठेही नाहियेत. पण पाहताना सगळ्यात गंमत वाटते ती अगदी जुन्या अंकांची. जेव्हा छपाईचं तंत्र नव्हतं तेव्हा हाताने अंक लिहिले जायचे, ते अंक पंडित यांच्या संग्रहात आहेत. महत्वाच्या व्यक्तींची जन्मशताब्दी आली की पंडित यांचं संशोधन सुरु व्हायचं. बालगंधर्वाच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ते असाच शोध घेत बालगंधर्वांच्या मुंबईतल्या घरी पोहचले. बालगंधर्वांचं मृत्यूपत्र या संग्रहात आहे. बालगंधर्वांच्या हस्ताक्षरातीलं हे पत्र- नाटकाचे प्रयोग होत नसल्याने पैशाची चणचण भासत होती, हे स्पष्टपणे या पत्रातून दिसतं. बालगंधर्वांना 1964 साली पद्मभूषण प्रदान करण्यात आलं. ते पदकही पंडित यांच्या संग्रहात आहे. तसेच त्यांचे दुर्मिळ फोटोही बालगंधर्वांच्या 1931 नंतरच्या आयुष्यावर वेगळा प्रकाश टाकतात. गायिका गोहरबाईंसोबत लग्न झाल्यावर बालगंधर्वांच आयुष्य काय होतं याची नोंद न नोंद पंडितांकडे असणार्‍या संग्रहात आहे. 1931 नंतर बालगंधर्वाच्या आयुष्यात काय घडलं यावर एस.के.पंडित संशोधनपर पुस्तक लवकरच प्रकाशित करणार आहेत. यानिमित्ताने गंधर्वांचा असा इतिहास जो आतापर्यंत कोणालाच माहीत नाही तो जगासमोर येऊ शकेल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close