S M L
  • प्रणवदा

    Published On: Jul 7, 2012 02:14 PM IST | Updated On: May 13, 2013 03:48 PM IST

    अर्थमंत्रालय आणि राष्ट्रपती भवन यामधलं अंतर फक्त 5 मिनिटांचं .. पण प्रणवदांना हे अंतर पार करायला अनेक वर्षं थांबावं लागलं. धोरणी राजकारणी, कुशल प्रशासक, काँग्रेसचे संकटमोचक, अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यायत.राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण मिळवलेल्या प्रणव मुखर्जी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या प्रतिभा ओळखली आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. 1973 मध्ये ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. आणि तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. दिवसेंदिवस प्रणवदांची राष्ट्रीय राजकारणावरची पकड मजबूत होत गेली. 80च्या दशकाच्या पूर्वार्धात तर त्यांचा दबदबा चांगलाच वाढला. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री झाले. पण 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि प्रणवदांच्या आयुष्यालाही कलाटणी मिळाली. राजीव गांधींच्या मर्जीतून उतरल्यामुळे काही काळासाठी त्यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला.1991 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर प्रणव मुखर्जी पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. मग मात्र ते कधीच थांबले नाहीत. सर्व पक्षांत त्यांचा मित्र परिवार आहे, त्यांचं नेटवकीर्ंग कौशल्य उत्तम असल्यानं त्यांना सर्व पक्षांत मानाचं स्थान आहे. गृह, परराष्ट्र आणि अर्थमंत्रालय यासारखी वेगवेगळी खाती त्यांनी सांभाळली. पण पंतप्रधानपदानं मात्र नेहमीच हुलकावणी दिली. असं असलं तरीही संसदेत राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत.. अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी त्यांनी सरकारची बाजू मांडली. प्रणव मुखर्जी म्हणजे यूपीएतलं एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व..एकाचवेळी त्यांनी जवळपास 60 मंत्रिगटांचं नेतृत्व केलं. आधी राज्यसभा गाजवणार्‍या प्रणवदांनी 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभाही जिंकली.अतिशय श्रद्धाळू वृत्तीच्या प्रणव मुखर्जी यांनी नेहमीच काम हीच पूजा मानली. ते रोज रात्री उशरापर्यंत ते काम करत असतात. त्यांचा स्वभाव तापट आहे. ते लवकर चिडतात. पण तेवढ्याच लवकर शांतही होतात. आणि आता राष्ट्रपतीपदासाठी त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानं त्यांचं हे स्मितहास्य असंच फुलत राहिल.कारण देशाचे प्रथम नागरिक बनण्याचा सन्मान त्यांना मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close