S M L

'देव तारी...'निसर्गाच्या तांडवातून 'रुद्र' सुखरूप बचावला

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2014 02:22 PM IST

'देव तारी...'निसर्गाच्या तांडवातून 'रुद्र' सुखरूप बचावला

31 जुलै : 'देव तारी त्याला कोण मारी...' असं म्हटलं जात पण उगाच नाही. माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. डोंगराच्या ढिगाराखाली 44 घरं गाडली गेलीय. आतापर्यंत या दुर्घटनेत ५७ जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो जण अजूनही ढिगाराखाली दबलेली आहे. पण या निसर्गाच्या रुद्रावतारातून रुद्र नावाचा एक तान्हुला सुखरुप वाचलाय. माळीणच्या या दुर्घटनेत प्रमिला लिंबे या आईने आपल्या या तीन महिन्याच्या तान्हुल्या रुद्रला दुर्घटनेतून सुखरुप वाचवलंय. शरीराची ढाल करुन या आईनं आपल्या बाळाला वाचवलंय. तीन महिन्यांचा लहानगा रुद्र या संकटातून वाचला तो केवळ या आधुनिक हिरकणीमुळे.

अस्मानी संकटाशी आठ तासांच्या साहसी लढा देऊन या माऊलीने आपला तर जीव वाचवला पण तीच्या संघर्षापुढे यमालाही हार मानावी लागली. गेली आठ तास रुद्र आणि तिची आई या ओल्या ढिगाराखाली दबलेली होती. ज्या ढिगाराखाली वाचण्याची शक्यता कमी आहे अशा प्रतिकूल परिस्थिती या माऊलीने पाठीची ढाल करुन ढिगार पाठीवर थोपवून धरला. आपल्या काळजाच्या तुकड्याला जीवाशी घट्ट पकडून ठेवलं. ढिगाराखाली दबल्यानंतर रुद्रच्या आईने रुद्रला मानेशी हात देऊन कुशीत धरुन ठेवलं होतं.

दुसरीकडे एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर ढिगार उपसण्याचं काम सुरू आहे. काम सुरू असताना जवानांना ढिगाराखालून रुद्रच्या रडण्याचा आवाज आला. क्षणाचाही विलंब न करत जवानांनी सावधतेनं ढिगार बाजूला सारला. ढिगाराखाली एक माऊली आपल्या चिमुकल्यासह मृत्यूशी झुंज देत असल्याचं पाहुन वातावरण स्तब्ध झालं. जवानांनी रुद्र आणि त्याची आई प्रमिलाला बाहेर काढलं. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या, आक्रोशमय वातावरणात क्षणभर समाधानाची आणि आनंदची एक लहर पसरली.

एक माऊली आपल्या चिमुकल्यासह या अस्मानी संकटाशी लढा देऊन सुखरूप बाहेर आली. निसर्गाच्या क्रूर दुर्घटनेत इवल्याशा रुद्रच्या पायाला मात्र किरकोळ जखम झाली. रुद्र आणि त्याची आई प्रमिलाला तातडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भयावह या दुर्घटनेतून ही माऊली आणि तिचा चिमुकला सुखरूप वाचला हे पाहून डॉक्टरही क्षणभर स्तब्ध झाले. एखाद्या सिनेमात ह्रदयस्पर्शी घडावी अशी घटना पाहून गावकर्‍यांच्या दु:खातही त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्याची झलक पाहण्यास मिळाली. निसर्गाशी दोन हात करणार्‍या या माऊलीच्या अद्वितिय धाडसाला सलाम...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 10:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close