S M L

माळीण दुर्घटना : मदतकार्य जवळपास पूर्ण

Samruddha Bhambure | Updated On: Aug 6, 2014 06:49 PM IST

माळीण दुर्घटना : मदतकार्य जवळपास पूर्ण

06 ऑगस्ट : पुण्यातल्या माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 151 झाला आहे. यात 71 महिला, 59 पुरुष तर 22 मुलामुलींचा समावेश आहे. या घटनेला आज 8 दिवस पूर्ण झाले असून, मदतकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र एनडीआरएफची एक टीम गावात राहणार आहे. आतापर्यंत 145 मृतदेह मिळाले आहेत तर काही मृतदेहांचे अवयव जोडून 6 मृतदेह अशा एकूण 151 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ढिगार्‍याखालील 8 जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे.

मागच्या आठवड्यात बुधवारी डोंगरकडा कोसळल्यामुळे माळीण गावातील सर्व घरं गाडली गेली. यात सुमारे 167 लोक गाडले गेल्याची भीती गावकर्‍यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली होती. त्यातील 8 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही आणखी 4-5 जणांचा पत्ता लागत नसल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 157 किंवा 158 वर जाण्याची भीती व्यक्त होत आहे आणि त्यामुळेच गावकरी, पोलीस, प्रशासकीय यंत्रणेची खात्री होईपर्यंत एनडीआरएफची एक टीम माळीणमध्येच राहणार आहे.

पुण्यातल्या माळीणमध्ये गेल्या 8 दिवसांपासून ढिगारा उपसण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने मदतकार्याला अडथळा निर्माण झाला होता. यात जिवंत व्यक्ती बाहेर काढण्याचे आव्हानही प्रशासनापुढे होते, त्यामुळे वेळ लागत होता. मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले होते. आज सकाळी माळीण परिसरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरीही एनडीआरएफच्या जवानांनी हे कठीण काम पूर्ण केले आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तसंच प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन केलं जाणार आहे तर दुसरीकडे या लोकांचे सामान चिखलात गेल्याने काही मौल्यवान वस्तूंचा शोध मृतांचे नातेवाईक घेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2014 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close