S M L

संजय दत्तला रजा वाढवून देण्यास सरकारचा नकार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 10, 2015 08:49 PM IST

संजय दत्तला रजा वाढवून देण्यास सरकारचा नकार

10 जानेवारी : अभिनेता संजय दत्ततर्फे करण्यात आलेला फर्लो रजा वाढवण्याच्या अर्जावर प्रशासनातर्फे नकार देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला 14 दिवसांची फर्लो रजा देण्यात आली होती. पण त्यामध्ये संजय दत्तला आणखी काही दिवसांची वाढीव रजा हवी होती. त्यासाठी त्याने येरवड्याच्या जेल प्रशासनाकडे अर्जही केला होता. हा अर्ज प्रशासनाकडून फेटाळण्यात आला असून संजय दत्तला तात्काळ पुण्यातील येरवडा जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुरूवारी संजयच्या फर्लोची मुदत संपली होती, गुरुवारी दुपारपर्यंत तो कारागृहामध्ये हजर होणे अपेक्षित होते. परंतु मुंबईहून सकाळीच पुण्याच्या दिशेने निघालेला संजय दत्त संध्याकाळपर्यंत पुण्यात फिरून वेळ घालवत मुंबईला परतला. तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत त्याने वाढीव रजेसाठी अर्ज केला होता. परंतु त्या अर्जावर निर्णय झाला नसल्याने त्याने आणखी दोन दिवस तुरूंगाबाहेर काढले. या प्रकरणावरून मोठा गदारोळ माजला, सरकारवरही टीकेची झोड उठली होती. अखेर आज सरकारने त्याच्या रजेचा अर्ज फेटाळून लावत त्याला तुरूंगात परतण्याचे आदेश दिले.

मुंबई बॉम्बस्फोटात स्वत:जवळ शस्त्र बाळगल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 18 महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे 2013 पासून उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी तो पुन्हा जेलमध्ये गेला. पण, या शिक्षेत, संजय दत्तने आतापर्यंत वारंवार सुट्टी घेतली आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कैद्याला 14 दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यामध्ये आणखी 14 दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता, ही रजा घेत असतानाच त्याने मुदतवाढीसाठीही अर्ज केला होता. हा अर्ज आज प्रशासनातर्फे फेटाळण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2015 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close