S M L

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

Samruddha Bhambure | Updated On: Jan 15, 2015 02:00 PM IST

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

15 जानेवारी :  रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून पिंपरीमधील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही मुलगी गेल्या 12 दिवसांपासून कोमाममध्ये आहे. पोलिसांकडे रोडरोमिओंबाबत वारंवार तक्रार करुनही पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केला आहे.

पिंपरीमधील भोसरी परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीची परिसरातील काही रोडरोमिओ छेड काढत होते. या रोडरोमिओंच्या छेडछाडीमुळे ती हताश झाली होती. या रोडरोमिओंविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती पण पोलिसांनी कारवाई केली नाही असे मुलीच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. तक्रार करण्यासाठी अनेक पोलिस ठाण्यांमध्ये फिरल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अदखलपात्र तक्रार दाखल करुन घेतली होती असा दावाही मुलीच्या आईवडिलांनी केला. पोलिसांनी केलेले दुर्लक्ष आणि रोडरोमिओंचा त्रास या जाचाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या 12 दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत आहे. आयबीएन लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले जाणार असून तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही सुलभा उबाळेच करणार आहेत तर शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित मुलीची विचारपूस केली.

दरम्यान, मुलीने आत्महत्येचा प्रयत्न करताच भोसरी पोलिसांना खडबडून जाग आली असून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पोलिसांनी बाबू नायक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख या तीन तरुणांना अटक केली आहे. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत रोडरोमिओंना अटक केली असती तर त्या मुलीवर गळफास घेण्याची वेळ आली नसती असे तिच्या आईवडिलांनी सांगितले. पोलीस कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करू असे सांगत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 12:52 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close