S M L

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या 'त्या' अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jan 19, 2015 03:00 PM IST

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या 'त्या' अल्पवयीन मुलीचा अखेर मृत्यू

19 जानेवारी :  रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून पिंपरीमधील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या त्या पीडितेचा काल मध्यरात्री मृत्यू झाला. गेल्या 17 दिवसांपासून ती कोमामध्ये होती. पोलिसांकडे रोडरोमिओंबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केला आहे.

याप्रकरणी पोलिसांची संपूर्ण कारवाई संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम घाईघाईत आटोपलं असून आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याशिवाय याप्रकरणातील एका महिला पोलिसाच्या तपासावर शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

पिंपरीमधील भोसरी परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीची परिसरातील काही रोडरोमिओ छेड काढत होते. या रोडरोमिओंच्या छेडछाडीने ही मुलगी हैराण झाली होती. या छेडछाडीला कंटाळून मुलीच्या पालकांनी रोडरोमिओंच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात खेटे घातले. पण पोलिसांनी कारवाई केली नाही, असे मुलीच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. तक्रार करण्यासाठी अनेक पोलिस ठाण्यांमध्ये फिरल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अदखलपात्र तक्रार दाखल करुन घेतली होती. त्या नैराश्यातूनच मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

मुलीने आत्महत्येचा प्रयत्न करताच भोसरी पोलिसांना खडबडून जाग आली असून प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी पोलिसांनी नंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी बाबू नायक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख या तीन तरुणांना अटक केली. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत रोडरोमिओंना अटक केली असती तर त्या मुलीवर गळफास घेण्याची वेळ आली नसती असे तिच्या आईवडिलांनी सांगितले. पोलीस कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करू असे सांगत भोसरी एमआयडीसी पोलिसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  रोडरोमिओंच्या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनही पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केल्यानंतर पोलिसांनी त्या पीडितांच्याच मागे चौकशीचा ससेमिरा लावला होता.

दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एपीआय आणि पीएसआय यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. हद्दीच्या वादामुळे पोलीस गुन्हा दाखल करूण घेण्यास टाळाटाळ करत होतं. त्यावर इतून पुढे हद्दीचा वाद होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्याचं बरोबर अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनंही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2015 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close