S M L

कॉमन मॅन हरपला, आर.के.लक्ष्मण यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2015 10:16 PM IST

कॉमन मॅन हरपला, आर.के.लक्ष्मण यांचं निधन

RK Laxman passes away 26 जानेवारी : आपल्या 'कुंचल्या'तून राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे आणि कॉमन मॅन घडवणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांचं निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण यांना किडनीचा त्रास होत होता. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मागील शनिवारी त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर डायलिसिस करण्यात आले पण उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना रविवारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज संध्याकाळी 6.10 वाजता या महान व्यंगचित्रकाराने जगाचा निरोप घेतला. लक्ष्मण यांच्या निधनामुळे कॉमन पोरका झाला अशी भावना व्यक्त होतं आहे.

कॉमन मॅनच्या व्यथा मांडतानाच त्यावर मिश्कील टिप्पणी करत हसु फुलवणार्‍या रेघा आता उमटणार नाहीत. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण आज आपल्यात नाहीये. रासीपुरम आर.के.लक्ष्मण....सर्वसामान्य माणसांच्या व्यथा आणि कथा त्यांच्या व्यंगचित्रांमधून मांडणारा महान व्यंगचित्रकार....या महान व्यंगचित्रकाराचा जन्म 23 ऑक्टोबर 1924 ला म्हैसूरमध्ये झाला. वडील म्हैसूर इथल्या शाळेत मुख्याध्यापक होते. त्यावेळी शाळेत येणार्‍या नियतकालिकांमधली वेगवेगळी चित्रं पाहून, आपणही तशीच चित्रं काढावीत असं लक्ष्मण यांना वाटू लागलं. लहानपणापासूनच त्यांचं या रेषांशी बंध जुळले होते.

अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रं स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टस इथं शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तिथं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी म्हैसूरमध्येच त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे ते नोकरी मिळवण्यासाठी दिल्ली गेले. तिथं 'हिंदुस्थान टाईम्स'नं कमी वय असल्याचं सांगून त्यांना नोकरी नाकारली. काही काळ 'ब्लिटझ' आणि 'फ्री फ्रेस जर्नल'मध्ये त्यांनी काम गेलं. त्यानंतर निवृत्तीपर्यंतचा सर्वकाळ त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्रं काढत राहिले. 'यू सेड इट' नावाचं त्यांचं व्यंगचित्रांचं सदर होतं.

आर के लक्ष्मण यांनी देश विदेशातल्या थोरामोठ्यांची व्यंगचित्रं काढली. त्यात त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचं प्रातिनिधिक रुप दाखवणारं व्यंगचित्र हे सगळ्यांचंच लक्ष वेधून घ्यायचं. पूर्वी जसा हा 'कॉमन मॅन' साधा होता, तसा तो आजही वाटतो. चौकड्याचा कोट, धोतर, असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी अनेक व्यंगचित्रं काढली. पण त्यांनी कधीच कुणाच्या व्यंगावर बोट ठेवलं नाही. कॉमन मॅनच्या माध्यमातून त्यांनी केवळ समाजाचं दुःख मांडण्याचाच प्रयत्न केला.

जवळपास पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध विषयांवर व्यंगचित्रं काढली. इतका दीर्घकाळ व्यंगचित्रं काढणारे बहुधा आर के लक्ष्मण हे एकमेव व्यंगचित्रकार असावेत. त्यांचा कॉमन मॅन देशातल्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींच्या उलथापालथीचा साक्षीदार आहे. आपल्या कुंचल्याचा वापर त्यांनी कधीही कुणालाही दुखावण्यासाठी केला नाही.

आर.के.लक्ष्मण यांची निरीक्षणशक्ती अतिशय तीव्र होती. त्यांच्याकडं अफाट आत्मविश्वास होता. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरॅलिसीसचा ऍटॅक आला होता. पण तरीही त्यांनी त्यांचा कॉमन मॅन रेखाटायचा सोडला नव्हता. आपल्या अचूक टिप्पणीतून व्यंगचित्रांमधल्या रेषांमधून त्यांनी तळागाळातल्या घटकांपर्यंत आपलं नातं जोडलं होतं. सर्वसामान्य भारतीयांच्या मानसिकतेचं त्यांना अचूक भान होतं. हे सगळं त्यांच्या कॉमन मॅनमधून व्यक्त होत होतं. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला त्यांनी केलेलं विधान पटायचं म्हणूनच त्यांचा कॉमन मॅन लोकप्रिय ठरला आणि दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणातही राहिला.

पण हा सर्वांचा आवडता, लाडका आणि लोकप्रिय कॉमन मॅन तुमचा आमचा सर्वांचा निरोप घेऊन कायमचा निघून गेलाय आपल्या सगळ्यांना सोडून....आर.के.लक्ष्मण यांना आयबीएन लोकमतच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2015 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close