S M L

अस्वस्थतेची 2 वर्षं!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 20, 2015 09:42 AM IST

अस्वस्थतेची 2 वर्षं!

20 ऑगस्ट : आज आहे 20 ऑगस्ट... दोन वर्षांपूर्वी याच दिवशी शाहू, फुले, आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात विवेकाचा खून झाला होता. अंधश्रद्धा निर्मुलनाचं मोठं काम करणारे विवेकवादी नेते नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आली आणि त्यानंतर दीड वर्षातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणखी एक घटना घडली... ती म्हणजे समाज प्रबोधनासाठी आयुष्य वेचणार्‍या कॉम्रेड गोविंद पानसरे यांचीही हत्या करण्यात आली. दाभोलकर जाऊन दोन वर्षं झाली तर पानसरे जाऊन सहा महिने झाले. पण दोघांचेही मारेकरी अजून मोकाट आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. राज्य सरकारही या गुन्ह्यांच्या तपासासाठी फारसे कोणी गंभीर नसल्याने पोलिसांकडून चालढकल करण्यात येत असल्याचं चित्र आहे. 'तपास सुरू' एवढेच सांगू शकत असलेले गृहमंत्रालय आणि पोलीस या दोघांचे मारेकरी शोधण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. सरकारच्या या कृतीशून्यतेचा निषेध करण्यासाठी आज अंनिसतर्फे राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. तर कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकर्‍यांना शोधण्यात आलेल्या अपयशाचा कोल्हापुरात कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी मॉर्निंगवॉक करत निषेध केला.

तपास यंत्रणांकडून दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी जंग जंग पछाडण्यात आलं असले तरी हल्लेखोर मात्र सापडलेले नाहीत. सध्या या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. 'सीबीआय' नेमका काय तपास करत आहे, गांभीर्याने तपास करण्यात येत आहे की नाही, याबाबत काही स्पष्टता नाही. त्यामुळे दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी याप्रकरणी आघाडी सरकारला धारेवर धरत त्यांचा राजीनामा मागितला होता. मग आता ते स्वत: मुख्यमंत्री असताना गप्प का?, असा खडा सवाल मुक्ता यांनी विचारला आहे.

दाभोलकर हत्येचा तपास सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पानसरे यांच्या हत्येचा तपासही गेल्या सहा महिन्यांपासून सुरूच आहे. 16 फेब्रुवारी रोजी पानसरे दांपत्यावर त्यांच्या राहत्या घराजवळच हल्ला करण्यात आला होता. उपचार सुरू असताना कॉम्रेड पानसरेंचा 20 फेब्रुवारीला मृत्यू झाला. दाभोलकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी राज्य सरकारकडून एसआयटी नेमण्यात आली. या पथकाकडून पानसरे यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी संशयित मारेकर्‍यांची रेखाचित्रं आणि सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी प्रसिद्ध केलं. पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी नेमके काय करावे, याबाबतही सूचना दिल्या. या घटनेलाही आता चार महिने उलटले आहेत. मात्र, दोन्ही घटनांच्या तपासात फारसे काही घडलेले नाही.

पानसरे आणि दाभोलकर हत्येच्या घटनांमध्ये साम्य आहे. हल्ला करण्याची आणि तसेच पळून जाण्याची पद्धत सारखी आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये हल्लेखोर किंवा या हत्याकांडाचा मास्टरमाइंड एकच असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पण इतका काळ लोटूनही मारेकरी आणि सूत्रधार यांचा सुगावा न लागणं हीच खरी शोकांतिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2015 08:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close