S M L

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी, वाढीव टेंडरसाठी रेक्टरला धमकी !

Sachin Salve | Updated On: May 18, 2016 04:08 PM IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी, वाढीव टेंडरसाठी रेक्टरला धमकी !

पुणे -18 मे : होस्टेलच्या कँटिनचं टेंडर वाढीव दराने मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने रेक्टरला फोनवरून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे धमकावणारे नगरसेवक बाळासाहेब बोडखे हे स्थायी समितीचे अध्यक्ष देखील आहेत. वसतिगृहाचे व्यवस्थापक सोमनाथ बनकर यांनी या संदर्भात पुरावे म्हणून फोनवर झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पालिका आयुक्तांकडे सादर केल्यात.

पुण्यातील घोले रोडवर महापौर बंगल्यासमोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 400 विद्यार्थी राहतात. त्यांच्या कँटिनचा 50 टक्के खर्च महापालिका करते तर उरलेला अर्धा वाटा विद्यार्थ्यांकडून घेतला जातो. नोव्हेंबर 2015 मध्ये मुदत संपल्यावर नव्याने निविदा मागवण्यात आल्या आणि नियमाप्रमाणे सर्वात कमी रक्कमेची निविदा मान्य करावी अशी शिफारस वसतीगृहाचे व्यवस्थापक सोमनाथ बनकर यांनी केली. समाज कल्याण उपआयुक्तांमार्फत स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरी करता गेला. राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या बाळासाहेब बोडके यांच्या प्रभागात हे हॉस्टेल येतं आणि बोडके यांनी 2990 प्रति विद्यार्थी प्रति महिना या दराच्या टेंडर ऐवजी 4000 रुपये प्रति विद्यार्थी प्रति महिना या महागड्या दराचे टेंडर पुढं दामटावं याकरता बनकर यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली.

7 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान 4 वेळा फोन करून बोडके यांनी दबाव टाकला असा आरोप बनकर यांनी केलाय. एवढंच नाही तर बनकर ऐकत नाही म्हटल्यावर किती टक्केवारी देणार,तुला कायम त्रास देणार अशा धमक्या देत कमीशनही मागितलं. बनकर यांनी एसीबीकडे दाद मागितली पण एसीबीने पोलिसांत तक्रार द्यायला सांगितलं. बनकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही दाद

मागितल्याचा दावा केला.

बाळासाहेब बोडके हे पुणे पालिकेत शिपाई म्हणून पूर्वी काम करायचे,एका शिपायाला स्थायी समिती अध्यक्ष केलं म्हणून राष्ट्रवादी पक्षाचं कौतुकही सर्व थरातून झालं पण टक्केवारीची कीड लागलेल्या आणि स्टँडिंग ऐवजी अंडरस्टँडिंग समिती अशी ख्याती झालेल्या समितीच्या अध्यक्षांवर आर्थिक हितसंबंध जपण्याकरता धमकी, पैशांची मागणी असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची चौकशी होवून सत्य बाहेर आलं पाहिजे हीच अपेक्षा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2016 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close