होम  »  ब्लॉग स्पेस

ब्लॉग स्पेस

भ्रष्टाचाराचं बीज !
May 14, 2012
भ्रष्टाचाराचं बीज !
Posted by रविंद्र आंबेकर | {5} कॉमेन्ट्स

महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त भागाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. या मुद्द्यावर यंदाच्या वर्षी नेहमीपेक्षा खूप जास्त चर्चा झाली असा आरोप सत्तेत बसलेल्या काँग्रेस – एनसीपी ने केलाय. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यातील लोकांसाठी मात्र हा जीवन-मरणाचा प्रश्न झालाय.


पंधरा जिल्ह्यातील 7 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यानंतर मुंबईतल्या एसी ऑफिसमधून निघून उन्हात तापून यावं म्हणून सांगली कडे निघालो. बाकीच्या गावांमध्ये पण पाण्याची टंचाई आहे, पण मुद्दामहून सांगलीला जायचं ठरवलं. राज्याच्या कॅबिनेट मधले तीन तीन ताकतवर मंत्री सांगलीचे, त्यामुळे जिथे सर्वांत जास्त प्रशासन राबू शकेल असा हा भाग. सांगलीचा जत-आटपाडी,कवठेमहंकाळ हा कायम दुष्काळी की टंचाईग्रस्त भाग.. नुकतंच 42 गावांनी कर्नाटक मध्ये जाण्याची धमकी दिल्यानं वातावरण आधीच तापलेलं. सांगलीत पोहोचलो त्याच दिवशी राजू शेट्टीनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा एक मोर्चा काढला होता. राजू शेट्टी बरोबर बैलगाडीत बसून मी ही ह्या मोर्चात सहभागी झालो. निमित्त अर्थात बातमीचं.. तिथल्या मोर्चात सामील झालेल्या शेतकऱ्यांशी बोलताना दुष्काळी भागातील राजकारणाच्या ही खाचा – खोचा समजून आल्या.. तिथून मग मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांची प्रेस कॉन्फरन्स होती म्हणून तिथे निघालो.. मला पाहताच पतंगराव म्हणाले, का आलास रे बाबा.. कर्नाटकात जात नाही कोणी.. सगळचं राजकारण तुला तर माह्यतंच आहे....नंतर इंटरव्यू-बिंटरव्यू देऊन एक दोन अधिकाऱ्यांना झापत झापत पतंगराव दिल्लीला रवाना झाले..


ज्याला भेटावं तो म्हणतो राजकारण आहे. आबा म्हणतात राजकारण आहे.. जयंत पाटील गप्पच असतात.. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी बोललं तरी एक गोष्ट कॉमन असते.. राजकारण...कार्यकर्त्यांचा नाद सोडून मग थेट आटपाडी ला निघालो.. सांगली चा झेडपी अध्यक्ष अमरसिंह देशमुख... आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातला पहिला अध्यक्ष.. अमरसिंह ला भेटलो... दुष्काळावरच्या उपाययोजनांमधल्या दूरदृष्टीचा दुष्काळ कायम त्याच्या बोलण्यातून जाणवत राहीला. अमरसिंहशी बोलताना खूप मुद्दे मिळाले, पण त्यातल्या ही अनेक मुद्द्यांच्या मुळाशी राजकारण होतं. अमरसिंहशी बोलल्यानंतर मग जरा आसपासच्या गावांमध्ये फिरलो.. तलाठी कार्यालयात गेलो तर हाताशी काही कागद लागले.. वाचलं ते शॉकिंग होतं.


दुष्काळी स्थितीशी लढण्याची तयारी सरकारने फेब्रुवारी महिन्यापासूनच केली होती. सरकारच्या शूरवीर अधिकारी आणि त्यांच्या रणनितीवर विश्वास ठेऊन राज्यकरणाऱ्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची वैचारिक दिवाळखोरी, दूरदृष्टीचा अभाव सर्वच काही त्या कागदांवर दिसत होतं. अधिकाऱ्यांच्या कागदांवर विश्वास ठेवायचा नाही म्हणून मग तडक शेटफळे गावाकडे निघालो..हातात कागद होते.. कागदावर शेतकऱ्यांची नावे होती.. 100 शेतकऱ्यांची नावे होती.. त्या शेतकऱ्यांशी बोलावं म्हणून गावातल्या न्हाव्याकडे गेलो. तिथे एक ग्रामपंचायत सदस्य हजामत करत बसले होते. कागद बघताच ते खूर्चीतून उसळले. आत्ताच्या आत्ता कलेक्टर ला फोन लाऊन बोलवतो...म्हणत त्याने कुणाला तरी फोन लावला.. मग माझ्याकडे फिरून म्हणाला कलेक्टरला बोललो..कृषीअधिकाऱ्याला पाठवतो बोलला लगेच... मी जरा उखडलोच होतो.. नंतर थोड्या वेळानं बाईकवर तीन चार जण आले.. प्रकार लक्षात आला की कलेक्टर सांगून त्याने तलाठ्याला फोन केला होता आणि मग तलाठ्यानं स्थानिक उपसरपंचाला पाठवलं मामला काय आहे हे समजून घ्यायला..


आता हे चार जणांचं टोळकं माझ्याकडचं कागद काय आहेत हे समजून घ्यायला लागले.. मी त्यांना सांगीतलं की ह्या गावातील 100 शेतकऱ्यांची नावं आहेत ह्या लिस्टमध्ये असं म्हणून मी नावं वाचायला सुरूवात केली.. त्यातील एकानं हे माझं नाव म्हणून मला थांबवलं.. जीव भांड्यात पडला.. वणवण संपल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर उमटलं.. मग मी लगेचच प्रश्नांवर प्रश्न टाकायला सुरूवात केली..

 

तुमच्याकडे जमीन आहे का ?

 

उत्तर – हो..

 

- काय पीक घेता...

 

उत्तर – प्यायला पाणी नाही, पीक कसलं.!!

 

- मग कृषी खात्यानं वैरण योजनेतून बियाणं दिलं ते घेतले का ?


उत्तर - नाही....


मग हळूच एक जण त्याला चीमटा काढतो आणि लगेच उत्तर बदलतं..

उत्तर - घेतलंय, पण पाणी नसल्यानं लावलं नाही.,.

 

मस्तच.... मला पाहीजे होतं ते मिळालं.. मग मी त्यांना एकेक कागद समजावून सांगू लागलो..नाव गणेश, शेती 2.5 एकर, पाण्याचा स्त्रोत – विहीर... वैरणासाठी 10 किलो बियाणं, खत आणि इतर काही बाही 8-10 किलो ची नोंद आहे.. बियाणं पेरल्याची तारिख फेब्रूवारी आणि वैरण तयार झाल्याची तारिख 15 एप्रिल 2012.. पुढे तुमची सही आणि कृषी तसंच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची सही...

 

सही तुमची आहे का..?

-  नाही..

 

(पुन्हा चिमटा)  नाही म्हणजे माझीच आहे..


आत्ता तर म्हणाला सही माझी नाही म्हणून..


- त्य़ाचं काय आहे, घरातलं कुणी तरी जाऊन उचलतात....त्यातलं आहे...

अच्छा, वैरण किती आलंय...


- कसलं येतंय.. पाणी तर पाहीजे ना..


मग, इथे तर लिहीलंय पाच टन वैरण आलंय म्हणून आणि घरच्या जनावरांसाठी तुम्ही ठेवलंय...गणेशचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.. उपसरपंचाचे चिमटे वाढले होते.. मग उपसरपंच म्हणाले, जरा दाखवतो चारा लावलाय काही लोकांनी.. उपसरपंच माझ्या गाडीत बसला.. हळूहळू मान्य करायला लागला की खूप समस्या आहेत.. पण गावातली तरूण मंडळी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतायत. माणसं फ्रॉड नव्हती.. गावाचं नाव जपण्याचा प्रयत्न होता.. त्यांनी एक हिरवं गार शेत दाखवलं.. वैरण होतं शेतात.. हेच सीएम ला पण दाखवलं असं एक जण म्हणाला.. पुन्हा दुसऱ्यानं चिमटा काढला..


ह्या शेताचा वापर स्क्रीन सेवर सारखा करण्यात येतंय हे लक्षात आलं. मग झाडाखाली बसलो सगळ्यांसोबत गप्पा मारत.. मग हळूच एक-एक जण म्हणाला.. आमच्या समस्या खूप मोठ्या आहेत.. इथं मिडीया ही येत नाही फार.. पुन्हा इथंच राह्यचंय.. म्हणून फार बोलताही येत नाही.. काय आहे ना खूप राजकारण आहे स्थानिक पातळीवर....


सांगलील्या दुष्काळी भागातल्या ओसाड जमीनीवर तीन लाख टन हिरवा चारा बघत बघत मी ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला.. विहीर हरवत होतीच आता चारा ही हरवायला लागलाय..
 

प्रतिक्रिया

Posted by prakashrthakur@rediffmail.com

भ्र्स्टाचारांने सर्व गावे तालुके जिल्हे राज्य आणि देश पिळून निघळेत.सत्तेतील लोक ह्यासाठी जबाबदार आहेत.हे लोक विकासाची कामे न करता पैसा कुठे खायला मिळेल त्यामधे आपला वेळ घालवतात.ह्यांचीच मर्जी किवा सटेलोट्टे सारकारी नोकराबरोबर असते.विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम भ्रासटाचर बंद व्हायला पाहिजे.पाऊस पडत नाही म्हणून सगळीकडे वृक्ष लागवड झाली पाहिजे.आणि सर्वात महत्वाचे लोकसनखेवर नियंत्रण.हे सर्व करायला मंत्र्यांना वेळ नाही.कारण त्यांचा वेळ पैसे कुठे मिळतात तिकडे असते.

Posted by prashant deshmukh

likewise if u visit ahmednagar dist specially dry area of shrigonda taluka u will find amazing records regarding chara depo and others.every government record is wrong throuhout india.the system is corrupted so deeply that none of the government employee is exception to that..If u have to catch chara depo frauds then go to mandavgan chara depo in shrigonda taluka.U will find that depo holders do not distribute chara as per weights on slips.They give chara in random mannner to farmers.

Posted by deepak jadhav

ही खरी पत्रकारिता

1
. 2 .

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी खेळाडूंवर आजीवन बंदी घालावी का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]