ब्लॉग स्पेस

गजराच्या कर्कश आवाजाने शीएम साहेब दचकून जागे झाले. डोळे चोळत गजर बंद करायला हात लांब केला. चाचपडूनही गजर बंद होईना म्हणून मोठ्या कष्टाने डोळे उघडले. तर हातात आलेले गजराचे घड्याळ पाहून दचकले...तोच उठा आता...असा आवाज वस्सकन् अंगावर आला अन् साहेब टुणकन् उडाले... ते पाहून तुणतुणे किचनपर्यंत वाजत गेले. ''आता हे असे सकाळपासूनच सुरू झाले आहे. आज तरी आईने सांगितलेला उपाय करते. कणकेचा दिवा ओवाळून फेकायला सांगते, त्या सी-लिंक पुलाच्या खाली...कुठे कुठे जात असतात...''
तोपर्यंत साहेबांनी मिटलेल्या डोळ्यांसमोर सत्यबाबांचे ध्यान डोळ्यासमोर आणले. या रुपाला पहिल्या दर्शनाच्या वेळीच किती दचकले होते आमचे खटले...आणि आता माझ्या दचकण्यावर इलाज शोधतायत...विचाराच्या तंद्रीत साहेबांनी भराभरा अंघोळ उरकली. पंचा नेसून देवघरासमोर बसले. हात जोडले. कान पकडले. सत्यबाबांनी सांगितलेला 'येस मॅडम, येस मॅडम' मंत्राचा जप केला. बाबा कृपा असू द्या तुमची...म्हणून माथा टेकताना 'कृपा' शब्द मनात घुमला. एकदम दचकले...आजूबाजूला बघितले, कोणी नव्हते!
साहेब घाईघाईने कपडे करायला गेले. तर कपाटावरच्या फोटोतील तिर्थरूप करारी नजरेने पाहत होते. साहेब जरा चपापले. अशी शिस्त, असा करारीपणा पाहिजे. साहेबांनी जॅकेटची कॉलर चाचपली. दिसतो का मी 'हेडमास्तरा'सारखा, असे पुटपुटत आरशात रूप न्याहाळले. तर तिर्थरुपांच्या शेजारी असलेली आई गालात हसल्याचा भास झाला.
साहेबांनी आज निश्चयच केला, कॉन्फिडन्स से रहने का! सगळ्या गोष्टींना कसे ऐटीत सामोरे जायचे. कार्यकर्त्यांनाही हेच शिकवायचे.
मंत्रालयातील गेटवरच्या पोलिसांनी साहेबांना कडकडीत सॅल्यूट ठोकला. वाट पाहत ताटकळलेल्या कार्यकर्त्यांनी नमस्कार केला. साहेबांनी डोळ्यावरचा गॉगल काढला. कार्यकर्त्यांकडे पाहून भुवया उडवल्या. काय गणपतराव कसे काय? साहेबांनी नाव घेतल्याने गणपतराव कृतार्थ झाले. ते पाहून साहेब स्वत:वर खूष झाले.
ऑफिसात गेल्यावर रोजच्याप्रमाणे साहेबांनी खुर्चीला नमस्कार केला. खुर्चीवरच्या फोटोंना नमस्कार केला. मॅडमच्या फोटोकडे लक्ष जाताच, सत्यबाबांनी दिलेल्या मंत्राचा जप केला. साहेब स्थानापन्न झाल्याचे दिसताच पीए मोठ्या अजिजीने फाईलींचा गठ्ठा घेऊन आले. गठ्ठा बाजूला सारत साहेब म्हणाले, फाईली नंतर, पहिल्यांदा जनता जनार्दन! कार्यकर्त्यांना बोलवा. त्यांना आत्मविश्वास आणि उभारी देण्यास प्रथम प्राधान्य...
कार्यकर्ते शक्य तेवढ्या नम्रतेने केबीनमध्ये आले. अदबीने बसले. अरे या बिनधास्तपणे या. छाती काढून बसा. कणा कसा ताठ ठेवावा माणसानं. आता आत्मविश्वासाने जगायचे. आपली बाजू उजवी आहे. पर्वाच मी दादांना भर मीटिंगमध्ये असे काही सुनावले की बस्स...आता नाही कुणाला घाबरायचे...वाघासारखे राहायचे. (गणपतरावांना तर वाटले, आता साहेब डरकाळीच फोडणार!)
तेवढ्यात दारावरचा चपराशी आला. सांगू लागला, साहेब एक लंबूटांग माणूस आलाय भेटायला. काय म्हणतोय काय? साहेबांनी विचारले. काही म्हणत नाही साहेब. पण हवेत नजर रोखून तोंडाने पुटपुटतोय. ''तू ना रुकेगा, ना झुकेगा...अग्निपथ!... अग्निपथ!!
तोपर्यंत त्या माणसाची लांबलचक सावली दारातून आत पडली. साहेबांनी मनोमन सत्यबाबांच्या मंत्राची उजळणी सुरू केली....आणि वाघाची शेळी झाली...निदान समोर बसलेल्या गणपतरावांनी तरी ती पाहिली...!!!
- रंगराव




