होम  »  कार्यक्रम  »  सानिया-शोएबच्या लग्नाचा वाद तुम्हाला निरर्थक वाटतो का?

 

लग्न ही सानिया मिर्झाची वैयक्तीक बाब आहे. त्यात राजकीय पक्षांना हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही, असे मत 'आजचा सवाल'मध्ये व्यक्त झाले. सानिया-शोएबच्या लग्नाचा वाद तुम्हाला निरर्थक वाटतो का? असा आजच्या चर्चेचा विषय होता. यात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, शिवसेनेचे कायदेविषयक सल्लागार राहुल नार्वेकर, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब खंदारे सहभागी झाले होते.


सुरुवातीला बोलताना नार्वेकर म्हणाले, आमच्या आमदारांनी विधानपरिषदेत भूमिका मांडली. त्याला प्रसिद्धी देण्याचे काम मीडिया करत आहे. लग्न हा वैयक्तीक मामला आहे हे मान्य. पण सानिया नॅशनल आयकॉन आहे. तिच्या यशात देशवासीयांचे योगदान आहे. तिला अर्जुन ऍवॉर्ड देण्यात आले आहे. देशवासीयांच्या प्रेमामुळेच ती एवढ्या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करण्याचा निर्णय घेताना तिने देशवासीयांच्या भावना लक्षात घ्यायला हव्या होत्या. देशाने तिला एवढे देऊनही ती लग्नानंतर दुबईत स्थायीक होण्याचा विचार करते, हे कितपत योग्य आहे?


तर अण्णासाहेब खंदारे म्हणाले, सानिया सर्व सामान्य नागरिक असती तर वादाचा मुद्दा नव्हता. शिवेसेनेने विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर चर्चा सुरू झाली. सानिया भारतातर्फे खेळते. अशा परिस्थितीत पाक खेळाडूशी लग्न केल्यानंतर भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच सुरू असताना सानियाने पाक टीमच्या बाजूने टाळ्या वाजवणे भारतातील लोकांना आवडणार नाही. यापूर्वीही रीना रॉयने पाक क्रिकेटपटूशी लग्न केले होते. पण ते कुणालाही माहिती नव्हते. पण सानिया देशाकडून खेळते हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे.


हेमंत देसाई म्हणाले, राजकीय पक्षांनी असे विषय घेणे हे महाराष्ट्रातील लोकांचे हे दुदैर्व आहे. शिवसेनेने पहिल्यांदा विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. मग 'सामना'ने त्यावर भूमिका मांडली. एकीकडे लग्न हा सानियाचा व्यक्तीगत प्रश्न आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे मग असा हस्तक्षेप कशाला करायचा? इतर राज्ये विकासाच्या महाराष्ट्राच्या पुढे जात आहेत. आणि राजकीय पक्ष अशा विषयांमध्ये अडकून पडले आहेत. या लग्नाविरूद्ध कुणीही पेटून उठलेले नाही. सानियावर अजूनही लोक तेवढेच प्रेम करत आहेत.


यावर धर्मेंद्र आणि हेमामालिनीच्या लग्नाचा विषयही लोकसभेत गाजला होता.आणि आत्ताचा विषय मीडियानेच वाढवला आहे आहे, असे नार्वेकर म्हणाले. त्यावर मीडियाला बोलत राहणे ही शिवसेनेची स्टाईल झाली आहे. राजकीय पक्ष किती भंपक झाले आहे, हे सांगण्याचा या निमित्ताने आमचा प्रयत्न आहे, असे 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे म्हणाले.
तसेच भारत पाकिस्तान आणि बांगला देश यांचा महासंघ व्हायला पाहिजे असे तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले होते. मग तुम्ही सोनियाच्या लग्नाला विरोध का करता, असे वागळे यांनी खंदारेंना विाचारले. त्याला उत्तर देताना खंदारे म्हणाले, लोहियांनी मांडलेल्या महासंघाच्या कल्पनेपासून पक्ष अजूनही दूर गेलेला नाही. पण पाकिस्तान टेनीस असोसिएशनने यात पडण्याचे कारण नव्हते. तेथूनच वाद निर्माण झाला.


यानंतर नॅशनल आयकॉन असल्याने सानियाने हे लग्न करताना विचार करायला हवा, असे नार्वेकर पुन्हा म्हणाले. तर मीडियाने विचारल्यावर अबूंनी आपले मत सांगितले. पक्षाने कुठेही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, असे खंदारे म्हणाले.
शेवटी देसाई म्हणाले, राजकीय पक्षांनी ज्या महत्वाच्या प्रश्नांबाबत भूमिका घ्यायच्या तिथे चुकतात. उदा. सपाने महिला आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका. शिवाय बहुसंख्य लोक खिलाडू वृत्तीने मॅचेस बघत नाही, असे खंदारे यांचे म्हणणे चुकीचे आहे. शिवाय शिवसेना बहुसंख्य लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नाही तर सेना आता सत्तेवर असती. त्यामुळे राजकीय पक्षांनी असले थिल्लर विषय न घेता मूलभूत प्रश्न सोडवण्याचे, जनतेच्या कल्याणाचे विषय घेतले पाहिजेत.

 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5