S M L

मोबाईल फोन घेताना...

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2017 05:24 PM IST

मोबाईल फोन घेताना...

amruta dhurve- अमृत्ता दुर्वे, सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत 

गेले काही दिवस हाच विचार मनात घोळतोय. की जेव्हा आपण 'नवीन' फोन घ्यायला जातो, तेव्हा नेमका तो किती 'जुना' असावा? म्हणजे आपल्यासाठी तो फोन नवीन असला.. तरी मार्केटसाठी, टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने तो जुना झालेला असतो. मग असा किती जुना झालेला फोन घेणं योग्य? असे अनेक फोन्स असतात, जे आपल्याला आवडतात. ज्याची फीचर्स भुरळ पाडणारी असतात. पण जे फोन्स खिशाला लगेच परवडणारे नसतात. पण हेच फोन्स मार्केटमध्ये काही काळाने, काही महिन्यांनी - वर्षांनी स्वस्त होतात. मग या फोन्सच्या मोहात पडायचं का? आयफोन 4, सॅमसंग गॅलक्सी S 2/3, गॅलक्सी नोट असे मागच्या पिढीतले अनेक फोन्स सध्या स्वस्त होऊन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मग हे फोन्स घ्यायचे का? आयफोन 4चं उदाहरण घेऊयात.

नुकतीच ऍपलने आयफोन 4 भारतीय बाजारपेठेत री-लाँच करण्याची घोषणा केली. आतापर्यंत 26 हजारांना मिळणारा आयफोन 4 आता 15 हजारांत मिळणार अशी चर्चा सुरू झाली. 15 हजारांत आयफोन म्हणून अनेकजण एक्साईटही झाले. पण तज्ज्ञांच्या मते 15 हजारांचा प्राईस टॅग कंपनीला परवडणारा नाही. ऑनलाईन वेबसाईट्स सध्या 22 हजारांना हा फोन विकतायत. आयफोन 4 नंतरच्या चार जनरेशन्स सध्या मार्केटमध्ये आहेत. पण सगळ्यात महाग असल्याने अजूनही ऍपलला म्हणावा तितका मार्केट शेअर काबीज करता आलेला नाही. बजेट फोन्स घेणारा ग्राहक भारतात सगळ्यात जास्त आहे म्हणूनच हा ग्राहक गाठण्याचा प्रयत्न ऍपल आयफोन 4 री-लाँचद्वारे करतंय. पण मग हा फोन किंवा असा इतर कोणताही फोन घ्यावा का?34636 phone 43

आयफोन 4चं उदाहरण घेतलं, तर हा फोन 3 वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आलेला आहे. 3.5 इंचांची स्क्रीन आहे आणि 8GB ची मेमरी आहे, जी तुम्हाला वाढवता येणार नाही. ही स्पेसिफिकेशन्स तीन वर्षांपूर्वी ग्रेट होती... पण आता काय? सध्याच्या जमान्यात यापेक्षा चांगलं हार्डवेअर असणारे अनेक फोन्स तुम्हाला याच प्राईस रेंजमध्ये मिळतील.

तीन वर्षांचा काळ हा मोबाईलच्या वयाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. यात खूप काही बदलतं. आणि मग हे जुने फोन्स नवीन टेक्नॉलॉजी नीट ऍडॉप्ट करू शकत नाहीत. सिस्टीममध्ये येणारे अपडेट्स हे तुम्हाला याही फोन्सना मिळतील. पण अपडेटनंतर फोन चांगला चालण्याऐवजी स्लो होईल कारण त्या फोनचं हार्डवेअर - प्रोसेसर त्या टेक्नॉलॉजीसाठी बनलेलंच नाही.

लेटेस्ट iOS7 आल्यानंतर आयफोन 4 वापरणारी अनेक मित्रमंडळी वैतागून दुसर्‍या फोनवर गेली. कारण फोन स्लो झाला. त्या फोनसाठी नवी ऑपरेटिंग सिस्टीम झेपणारी नव्हती. असं असताना नव्याने हा फोन घेण्यात काहीच अर्थ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आताच्या फोन्समध्ये आलेली अनेक फीचर्स या आयफोन 4 मध्ये नाहीत. मग आयफोन 4चं हे डील कोणासाठी? तर अशांसाठी ज्यांना आयफोन हवाच आहे. पण ज्यांना फास्ट प्रोसेसर, चांगली फीचर्स - कॅमेरा यांची गरज नाही. फोन वापरणार फक्त कॉल्ससाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी... पण मग त्यासाठी 15 ते 22 हजार तरी का खर्च करा? 10 हजारांच्या बजेटमध्ये असे अनेक चांगले फोन्स मिळतील जे ही फीचर्स पुरवतील. त्यामुळे मोबाईल कंपन्यांच्या अशा ऑफर्सपासून जरा सावधान. सुदैवाने भारतामध्ये नोकिया लुमिया, मायक्रोमॅक्स, XOLO असे अनेक फोन्स कमी बजेटमध्ये लेटेस्ट हार्डवेअरचे ऑप्शन्स देतायत आणि त्यांचा परफॉर्मन्सही चांगला आहे. त्यामुळे ऑफर्सच्या जाळ्यात न अडकता हे पर्याय चोखाळायला हरकत नाही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2014 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close