S M L
  • श्रीसंत आणि वाद !

    Published On: May 16, 2013 04:40 PM IST | Updated On: May 17, 2013 01:53 PM IST

    16 मे एस. श्रीसंतची क्रिकेटमधली कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरलीय. खेळाच्या मैदानावरचे श्रीसंतचे किस्से आजपर्यंत गाजले होते. पण आताच्या या घटनेमुळे त्याचं क्रिकेटमधलं करिअरच संपल्यात जमा झालंय. आपण एक नजर टाकूया वादग्रस्त श्रीसंतच्या क्रिकेट करिअरवर... शांताकुमारन श्रीसंत... केरळाच्या हा फास्ट बॉलर आपल्या ऑन फिल्ड कामगिरीपेक्षा ऑफ द फिल्ड कामगिरीमुळेच जास्त गाजला. ऑक्टोबर 2005 मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या श्रीसंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिसला तो दक्षिण आफ्रिकेत..आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये श्रीसंतनं आपला अचूक मारा आणि स्विंग बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला फक्त 84 रन्समध्येच गुंडाळलं. आणि भारताला आफ्रिकेच्या भूमीवर पहिला टेस्ट विजय मिळवून दिला.पण याच मॅचमध्ये आंद्रे नीलबरोबर झालेल्या शाब्दिक चकमकीसाठी श्रीसंतला शिक्षाही केली गेली. नीलला सिक्स मारल्यानंतर श्रीसंतनं पीचवरच डान्स केला होता आणि त्यातून ही शाब्दिक बाचाबाची झाली होती. तर एका मॅचमध्ये इंग्लंडचा त्यावेळचा कॅप्टन मायकल वॉनला धक्का दिल्या प्रकरणी श्रीसंतची अर्धी मॅच फी कापून घेतली गेली होती. पण आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये त्याच्या करिअरचा सर्वात मोठा वाद रंगला. हरभजन सिंगनं श्रीसंतला कानाखाली मारल्यानंतर हमसून हमसून रडणारा श्रीसंत टीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. त्यानंतर हरभजनला त्या संपूर्ण सीझनसाठी बॅन केलं गेलं तर 5 वन डे मॅचची बंदीही त्याच्यावर लावली गेली. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट मॅचमधल्या गैरवर्तणुकीनंतर बीसीसीआयनं श्रीसंतला 2009 मध्ये शेवटची ताकीद दिली. आपल्या वर्तणुकीत सुधारणा करण्यासाठी श्रीसंतला खरंतर ही अखेरची संधी होती. पण त्यानंतरही श्रीसंतचं ऑन फिल्ड गैरवर्तन सुरुच राहिलं. पण त्यावर सर्वाधिक टीका झाली ती कॅप्टन महेंद्र सिंग धोणीनं श्रीसंतबद्दल खुलेआम नाराजी व्यक्त केल्यानंतर... 2011 मध्ये भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर श्रीसंत सातव्या आसमानात होता. पण म्हणतात ना, की जुन्या सवयी जात नाहीत, तेच नेमकं श्रीसंत बाबतीत घडलं. दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅकसाठी श्रीसंत आतूर होता पण आयपीएलच्या या सीझनअगोदर हरभजन सिंगबरोबर झालेल्या 'स्लॅपगेट' प्रकरणाचा उल्लेख श्रीसंतने ट्विटरवर केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं. हरभजन सिंगला त्यानं पाठीत खंजीर खुपसणारा असं संबोधलं आणि हरभजननं आपल्याला कधी मारलंच नव्हतं असाही खुलासा केला. इतकचं नाही तर ते प्रकरण प्रसिद्धीसाठी मुद्दाम घडवून आणल्याचंही त्यानं ट्विटरवर लिहीलं.पण स्पॉट फिक्सिंग प्रकरणी झालेली अटक ही श्रीसंतच्या संपूर्ण करिअरमधली सर्वात वादग्रस्त घटना ठरली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीसंतबरोबर राजस्थान रॉयल्सच्या आणखी 2 खेळाडूंना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिल्ली पोलीस करत आहेत. पण एक गोष्ट नाकारून चालणार नाही की श्रीसंत आणि वाद हे एक न तुटणारं नात आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close